अखेर १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी पंधराव्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार थंडावला आहे. आता २० तारखेला मतदान यंत्रात राज्याच्या येत्या पाच वर्षाचे राजकीय भवितव्य बंद होणार आहे. त्यावेळी निवडणूक प्रचार थांबला असताना काय स्थिती आहे? कुणाच्या बाजूने पारडे झुकण्याची शक्यता आहे याचे माध्यमांतून अनेक अंदाज व्यक्त होताना दिसत आहेत. अनेक ओपीनियन पोल देखील होवून गेले आहेत. पण खरी ‘पोलखोल’ तेवीस नोव्हेंबरच्या निकालात होणार आहे. ढोबळमानाने सांगायचे झाले तर यावेळी विरोधीपक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडून आपसांत अनेक मतभेद आणि कुरघोडीच्या मुद्यांसोबतच भाजप महायुतीला झुकविण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. अनेक महत्वाचे मुद्दे आहेत, सर्वात महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या मतदारांच्या अस्मितेचा आहे. मतदारांनी जो काही कौल दिला तो निवडून आलेल्या आमदारांनी स्वत:चा सौदा करून कुणाच्या तरी दबावाखाली किंवा अमिशाला बळी पडून विकल्याचे मागच्या काळात पहायला मिळाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांतून किंवा काँग्रेसमधून सुमारे शंभर जणांनी निष्ठा केवळ राजकीय स्वार्थासाठी बदलून सत्ता हाती घेतल्याचे पहायला मिळाले आहे. अगदी असाच आरोप मुख्यमंत्र्याकडून उध्दव ठाकरे यांच्यावर होताना दिसत आहे. की केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी ठाकरे यांनी जनादेश बाजुला ठेवून भाजप विरोधी पक्षांशी घरोबा केला. पण हे अर्धसत्य आहे.
२३नोव्हें२०१९ला आपण पहाटेचा शपथविधी पाहिला आहे. त्यामध्ये आधी ठाकरे सोबत येत नव्हते तेंव्हा भाजपने अजित पवारांसोबत अचानकपणे घरोबा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बारा दिवसांनी उध्दव ठाकरेंचा महाविकास आघाडीचा शपथविधी झाला होता. त्यामुळे शिंदे म्हणतात तसेच गद्दारी ठाकरे यांच्याकडून नाही तर भाजपकडून आधी झाली होती हा इतिहास आहे. असो.
महत्वाचा मुद्दा आता हाच आहे की निवडणूक झाल्यानंतर भाजपचे राज्यपाल काय करणार आहेत? त्यावेळी कोश्यारी यांनी जी होशियारी केली त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी २०२३च्या निकालात असंविधानिक कृत्य केल्याचा ठपका लागला आहे. मात्र यावेळी २३ तारखेनंतर राज्यपालांकडून संविधानाच्या कक्षेत राहून वर्तन होणार आहे का? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. निवडणुकीत कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात आणि कोणता पक्ष किंवा आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करतात यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यात भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे मतदानापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र नेमके निकाल आणि संख्याबळ काय सांगते ते अजूनही निवडणूक आयोग(Election Commission) आणि मतदारांच्या हाती आहे. त्यामुळे २० तारखेला मतदान करताना मतदारांना जागरूक राहून मतदान करण्याची गरज आहे.
राज्यात जवळपास सर्वच मतदारसंघात बहुरंगी लढती होत असून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षांला अडचणीच्या पिपाणी या चिन्हावर सुमारे १६० अपक्ष मैदानात आहेत. तर शिवसेना उबाठा ला अडचणीच्य असलेल्या चिन्ह आईस्क्रिम कोन च्या निशाणीवर ६५ पेक्षा जास्त टिकाणी अपक्ष मैदानात आहेत. ही पिपाणी तुतारी वाजविणाऱ्या माणसाच्या चिन्हा जवळ आल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात ८० हजार मतांचा फटका राष्ट्रवादीला बसला होता, त्यानंतर त्यापक्षाने आयोगाला तक्रार केल्यानंतरही हे चिन्ह आयोगाने न हटविता त्याचा सर्वाधिक वापर केल्याने आयोग किती निष्पक्षपणे काम करत आहे ते समोर आले आहे. तीच गोष्ट मशाल आणि आइस्क्रिम कोन या चिन्हांबाबत आहे. त्यामुळे असे चकवे आणि अडथळे मतदारांना लक्ष देवून पहावे लागणार आहेत.
या शिवाय मतदार याद्यांमध्ये देखील मागील वेळच्या लोकसभेच्या मतदानात बरेच गोंधळ घालण्यात आले होते. सन २०१९मध्ये विधानसभा निवडणूकीत ८९४४६२११ मतदारसंख्या होती. ती आता ९७०२५११९ अशी ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत झाली आहे. मागच्या २०१९च्या विधानसभेच्या तुलनेत सुमारे ७५,७८९०८ मतदार वाढले असून त्यांची सरासरी २८८ मतदांरसंघात पाहिली तर साधारण २६३१६ मतदार प्रत्येक मतदारसंघात वाढले आहेत.. याशिवाय दिव्यांग६४१४२५ आणि ८५ वर्षावरील मतदारांची संख्या १२४३१९२ आहे, ज्यांचे टपाली मतदान आधीच पूर्ण करण्यात आले आहे. त्याशिवाय पोलीस आणि सुरक्षा दलांतील सुमारे लाखभर पेक्षा जास्त कर्मचारी शासकीय कर्मचारी यांचे टपाली मतदान पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये देखील लक्षणीय वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तर अश्या प्रकारे आयोगाकडून ‘मतदानाची तयारी पूर्ण’ करण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कोणालाही काही शंका घेण्याचे कारणच राहिले नाही. आता परिक्षा आहे ती मतदारांची आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेची नाही का?
निवडणूक प्रचार टिपले असताना, त्याची सांगता होत असतानाच भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदी यांनी चार दिवस आधीच प्रचारातून बाजुला जात विदेश दौरा काढून सर्वाना धक्का दिला आहे. तर मणिपूरचे कारण देत गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी चक्क नागपूरात येवूनही सभा रद्द करून परत जाणे पसंत केले आहे. यावरून आता नेमके काय कारण असावे की नेहमी आग्रहीपणे प्रचारात आघाडीवर असणारे हे नेते मध्येच माघारी गेले आहेत यावर विरोधकांकडून सावध वक्तव्ये केली जात आहेत.
दुसरीकडे राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात रोख पैसा वाटप करून अमिशे देण्याचे प्रमाण यावेळी सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. तर इंडिया टुडे या वाहिनीच्या पत्रकारांकडून इवीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्या एका अमेरिकेतून आलेल्या हॅकरचे स्टिंग ऑपरेशन करत साऱ्यांची चिंता वाढविण्याचे काम केले आहे. तर अपक्ष आणि बंडखोरांमुळे बहुरंगी लढती होत असल्याने अनेक पर्याय देखील समोर आहेत. मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात त्यामुळे होणार असून मतदारांना आपल्या मताचा प्रभावी वापर करण्यासाठी ही स्थिती आव्हानात्मक आहे असेच म्हणावे लागेल. निवडणूक प्रचार संपताना काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी(Rahul Gandhi) आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याकडून अदानींच्या विरोधात धारावी प्रकल्पाच्या मुद्यावर जोर देण्यात आला आहे. तर भाजप आणि मुख्यमंत्र्याकडून हिंदू-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा तसेच विकासाच्या मुद्या व्यतिरिक्त व्यक्तीगत टिका टिपणीवर भर देण्यात आला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात या निवडणूकीत सरळ सामना होताना दिसत असून बारामती कुणाची याचा फैसला मतदार घेणार आहेत. एकूणच यावेळच्या निवडणूकीत केवळ राज्याचे नाहीत तर देशाच्या भवितव्याशी संबंधित विषयांचा निर्णय मतदारांकडून घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
विधानसभा निवडणूक विशेष
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
अदानी, अडाणी आणि अनाडी… न्यूजलाँड्रीच्या निमित्ताने सुरू झाला राजकीय धोबीघाट!