महाराष्ट्रात संभाव्य (भावी) मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील नेत्यांच्या मागेच का ‘शुक्लकाष्ठ’?

राजकीय षडयंत्रात महाराष्ट्राच्या अब्रुचे धिंडवडे, अजून कितीकाळ? ‘तो देवच जाणे’! : मित्राची मन की बात!

मशहूर शायर मिर्झा गालिब यांची एक अत्यंत प्रसिध्द कविता आहे, दरवर्षी नववर्ष सुरू झाले की, एकदा तरी या प्रसिध्द कवितेच्या ओळी मनात तरळून जातात. आणि प्रत्येक वेळी निवडणूकांचे मतदान आणि निकाल लागून नवे सरकार आले की, त्यांच्यासाठी देखील या ओळी लागू पडतात असे लक्षात येते. सामान्य माणूस कसा जगत असतो याचा हा वास्तविक जीवनानुभवच गालिब यांनी नेमक्या शब्दांत मांडला आहे. शायर म्हणतो–
‘इक बरहामन ने कहा है के ये साल अच्छा है, ज़ुल्म की रात बहुत जल्द ढलेगी!
अब तो आग चुल्हों में हर इक रोज़ जलेगी, अब तो भूख के मारे कोई बच्चा नहीं रोएगा!
चैन की नींद हर इक शख्स़ यहाँ सोएगा, नए वादों का जो डाला है वो जाल अच्छा है!
रहनुमाओं ने कहा है के ये साल अच्छा है, दिल के ख़ुश रखने को ग़ालिब ये ख़याल अच्छा है !’

शेवटची ओळ स्वप्नातील खयाली ‘पुलाव’ काढून टाकून एकदम वास्तवात जमीनीवर घेवून येते असे वाटले ना? दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है! या ओळी आता आणखी एका गोष्टीला लागू होतात असे वाटले ते काय? तर ‘मतदानोत्तर चाचण्या’ म्हणजेच मराठीत त्याला ‘एक्झीट पोल’ म्हणतात ना? तेच, ज्यांचा ‘खयाली पुलाव’ ज्याला ‘जसा जमला तसा’ तो मांडून लोकांच्या मनात ‘नँरेटिव सेट’ (अर्थातच फेक) करण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून सामान्य माणसाला, मतदाराला निकालातील ‘गडबडझाला’ केला तरी तो पचनी पडायला सोपा जावा.! अलिकडच्या काळात या ‘गडबडझाला’ मध्ये चक्क राजीवकुमार यांचा निवडणूक आयोगही थेटपणे मुख्य सूत्रधाराच्या भुमिकेत असल्याचा आरोप सर्रासपणे होत असतो, मात्र त्यावर सक्षम यंत्रणा असलेल्या न्यायालयांकडून दखल म्हणावी तशी घेण्यात येत नाही! असे गेल्या काही वर्षात जाणकारांच्या लक्षात आले आहे.

evm
तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांमध्ये सर्वात महत्वाचा रंजक भाग सुरू झाला आहे. सामान्य मतदारांकडून मताधिकाराचा प्रयोग झाला आहे. लोकशाहीचे भविष्य ‘इव्हीएम’ यंत्रात बंद झाले आहे, आता कसोटी आहे ती निवडणूक आयोग, राज्यपाल, केंद्र सरकार, राष्ट्रपतीभवन आणि आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयाची! महाराष्ट्रात २०१९नंतर गेल्या पाच वर्षात या साऱ्या यंत्रणा कश्या संविधानाला धाब्यावर बसवून वागतात त्याचा जिवंत अनुभव आपण सा-यांनी घेतला आहे. त्यानंतर आता जनता पुन्हा नव्याने निवडणूकांना सामोरी गेली आहे. २० तारखेला सायंकाळी पाच वाजता सुमारे ५८ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले मात्र मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपल्यावर अंतिम आकडेवारी काही समोर आली नाही. कारण रात्री उशीरापर्यंत अनेक ठिकाणी मतदान पूर्णच झाले नव्हते म्हणे!

सायंकाळी शेवटच्या तासात एकदम उर्वरीत गर्दी पन्ना प्रमुखांच्या सजग मार्गदर्शनातून गोळा केली जाते आणि सहा वाजता संपायचे मतदान अनेकदा रात्री नऊपर्यंत सुरू राहते अशी माहिती निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी मित्राने दिली. तर पूर्वीपासून ही आकडेवारी दुस-या दिवशी सायंकाळपर्यंत येत असे. मात्र अलिकडच्या अनेक निवडणूकांमध्ये सर्व तांत्रिक सोयीसुविधा आणि संपर्काची अद्य़ावत साधने असताना आयोगाला दोन-तीन अगदी पाच सहा दिवसांपर्यत वेळ लागतो. नेमके किती मतदान अंतिमत: झाले ते जाहीर करण्यासाठी! या वेळी किमान २३ तारखेला सकाळपर्यंत आयोगाने ही अंतिम टक्केवारी जाहीर करावी अशी आशा करूया. कारण आता हल्लीच्या टक्केवारीचा अनुभव असा आला आहे की, ही आकडेवारी सहा सात टक्क्यापर्यंत वाढवून दिली जाते, आणि ती चार पाच अगदी सात दिवस जाहीर केली जात नाही. गंमत म्हणजे त्यात टक्केवारी आली तरी नेमके बुथनिहाय आकडे मात्र सांगितले जात नाहीत. इतका वेळ घेतल्यानंतर देखील गोपनियतेचा हवाला देत हे आकडे लपवले जात असल्याचे दिसून आले आहे असा जाणकारांचा अनुभव असल्याचे समोर आले आहे, असो.
तर सन २०१४ पासूनच्या आयोगाकडून जाहीरपणे दिलेल्या अंतिम आकडेवारीवर एक नजर टाकूया.

२०१४ च्या विधानसभेत एकूण मतदान ६३.०८टक्के तर २०१९मध्ये ते ६१.०१टक्के झाले होते. अगदी अलिकडे लोकसभा २०२४मध्ये महाराष्ट्रात ६१.३३ टक्के मतदान झाले आहे. आता त्यावरून यावेळच्या मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज लावता येवू शकतो किंवा अपेक्षित मतदानाचा वेग पाहता नेमके किती मतदान अंतिमत: होवू शकते त्याची अटकळ बांधता येते. अर्थात यावेळी २३ तारखेला दोन दिवसांनी प्रत्यक्ष निकालाची तारीख आहे त्यामुळे आयोगाने किमान निकाल लागण्यापूर्वी तरी नेमके किती मतदान झाले ते जाहीर करावे अशी विनंती राज्याचे मुख्य निर्वाचन अधिकारी एस चोक्कलिंगम साहेबांना आपण करूया नाही का?

तर या टक्केवारीचा अंदाज यावेळी ६५ टक्के पर्यत गृहित धरायला हरकत नसावी. मात्र मागील काही निवडणूकांमध्ये आयोगाकडून जी अंतिम टक्केवारी जाहीर केली जाते त्यात सहा-सात टक्केंची वाढ धरली जाते, त्यात टपाली मतदान, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक आणि सुरक्षा बलांचे मतदान असे अन्य घटक जोडले जातात. मात्र त्यामुळे सहा सात टक्के मतदान वाढणे म्हणजे निकालातील सुमारे २०-२५ जागांचा निकाल बदलण्याइतके मतदान असा अनुभव येवू लागला आहे. त्यामुळे या आकड्यांच्या ‘जगलरी’ किंवा ‘हातचलाखी’ला आयोगाकडून विश्वासार्हता कशी मिळेल? यावर सध्या संभ्रमाची स्थिती आहे.


सर्वात महत्वाचे म्हणजे जाणकारांच्या या वाढीव आकडेवारीच्या खेळावर आधारित ‘एक्झीट पोल’ तयार केले जातात, आणि ‘गडबडझाला’ लोकांच्या माथी मारण्यासाठी, त्यांच्या मानसिकतेमध्ये बिंबवण्यासाठी ‘माईंड गेम’ म्हणून वास्तवाच्या विपरीत निकाल लागल्याचा आभास निर्माण केला जातो, असे या क्षेत्रातील अनेक आभ्यासक, पत्रकार, तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते माणसाच्या मनात एकादी मनाविरुध्द असलेली बाब देखील चार-सहा वेग-वेगळ्या पध्दतीने सांगण्यात आली की, त्याचे मन पटत नसले तरी ती गोष्ट स्विकारण्यास तयार होते. आणि निकालात ‘गडबडझाला’ करणारे याच तंत्राचा वापर करून आपल्याला हवे तसे निकालात ‘झोलझाल’ करून ती जनतेच्या पचनी पाडण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच यामध्ये निवडणूक यंत्र-यंत्रणा आणि अन्य अनेक घटकांचा देखील महत्वाचा भाग असतो. असे जाणकार सांगत आहेत.

आज तक या वाहिनीने तर ऐलन मस्क यांच्यासोबत काम करणाऱ्या एका कथित तंत्रज्ञाचा फोनवरून संवाद जाहीर करत महाराष्ट्राच्या २८८ पैकी २७१ निकांलामध्ये हँकिंग करून हेराफेरी करण्याचा दावा असल्याचे धक्कादायक कार्यक्रम गेल्या चार सहा दिवसांपूर्वी प्रसारीत केले आहेत. अर्थात सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग मात्र यावर काही एक मान्य करण्यास तयार नाहीत. त्यांच्यामते जगात कुठेही ही यंत्र कार्यरत नसतील, अगदी ज्या जपानमध्ये यांचा सर्वप्रथम उपयोग आणि निर्मिती झाली असली, आणि त्यानी देखील ही पध्दत पारदर्शक नसल्याचे सांगत नाकारली असली तरी भारतातील यंत्र मात्र शंभर टक्के सेफ आहेत असे आयोग सांगतो. कदाचित भाजपच्या घोषणेचा हा देखील एक गुढ अर्थ असावा, एक है तो सेफ है. हा एक म्हणजे ‘इवीएम’ असावेत! असे तर नाही ना? ते आहेत तोवर सत्ताधारी भाजप सेफ आहे असे तर मोदी महोदयांना संकेतार्थातून सूचवायचे नसेल ना? पहा विचार करण्यासारखी बाब आहे बरे! असेही भाजप विरोधक सांगत असतात.

evm
तर काट्याची टक्कर, नेक टू नेक फाईट सध्या महाराष्ट्रात होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. काहींच्या मते भाजप मित्रपक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. तर लोकसभेच्या आकडेवारी आणि मतदानाची टक्केवारी पाहता मविआचा पुन्हा कट टू कट बोलबाला होण्याचा अंदाज काहीजण व्यक्त करताना दिसत आहेत.


मतदान आणि निकाल यांच्या कार्यक्रमा दरम्यानच्या काही घटना आणि घडामोडी जरी पाहिल्या तरी नेमके काय होण्याची शक्यता आहे त्याचा अंदाज लावता येतो असे माझ्या एका पोलीस अधिकारी मित्राने त्यांच्याकडील (गोपनीय) माहितीच्या हवाल्याने म्हटले आहे. मित्र म्हणाला की, निकालांच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य शर्यतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी शपच्या एका नेत्यावर हल्ला होतो. भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला अडकविण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याच दिवशी मविआमध्ये संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असण्याची शक्यता असलेल्या सुप्रिया सुळे, आणि नाना पटोले यांच्यावर ‘बिटकॉईन क्रिप्टो करन्सी’ प्रकरणी आरोप केला जातो. त्यातही पुन्हा ‘फोन टॅपींग’ हा २०१९मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमधील महत्वाचा भाग पहायला मिळतो. गंमत म्हणजे निवडणूक काळात ज्या ‘वादग्रस्त पोलीस महासंचालकाच्या बदलीसाठी’ ‘काँग्रेसच्या ज्या नेत्याने आग्रही भुमिका घेतली’ त्यांच्याच ‘फोनची रेकॉर्डिंग व्हायरल’ केली जाते. त्यातही ए आय आणि डिप फेकच्या युगात याबाबतचा आरोप सिंथेटिक तंत्राच्या मध्यमातून केला गेल्याचे फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट होते. तरी देखील अशी कुणी तरी व्यक्ती किंवा यंत्रणा आहे, जी महाराष्ट्रात संभाव्य भावी मुख्यमंत्री होण्याची शक्यता असलेल्या नेत्याच्या मागे ‘शुक्लकाष्ठ’ लावण्याचा प्रयत्न करत असावी, आता हे ‘शुक्लकाष्ठ’ कितपत प्रभावी होते? आणि अश्या राजकीय षडयंत्रात अजून महाराष्ट्राच्या अब्रुचे कितीकाळ धिंडवडे निघत राहणार आहेत ते ‘तो देवच जाणे’ असे हा मित्र म्हणाला! तुर्तास इतकेच!

 

विधानसभा निवडणूक विशेष
किशोर आपटे.

(लेखक व राजकीय विश्लेषक)

 

महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या ‘कोणीच एक नाही की सेफ ही’ नसल्याचे स्पष्ट!? : राजकीय चर्चांना उधाण!

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *