विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा नार्वेकरांची बहुमताने निवड होण्याची शक्यता; मविआमध्ये अस्वस्थता!

मुंबई दि. ७: राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीला तब्बल २३१ जागा मिळाल्या त्यात भाजपनं १३२जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाला ५७ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासह विधानसभा अध्यक्षपद भाजपकडेच राहणार आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र तीन प्रमुख पक्ष मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला एकत्र केवळ ५० जागाच जिंकता आल्या. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीसह विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी बारापर्यंत अर्ज करता येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा भाजपकडून राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव भाजपकडून जवळपास निश्चित झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष देखील आता भाजपचाच होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान राहुल नार्वेकर हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते, महायुतीमध्ये यावेळी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती.मात्र भाजपमध्ये विधानसभा अध्यक्षपद घेण्यास ज्येष्ठ सदस्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नार्वेकर यांनाच कायम करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यात दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई तसेच आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात पोहोचलं. त्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. दरम्यान आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हेच विधानसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *