अधिवेशन विशेष… सावध ऐका पुढल्या हाका! :  भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी!?

महाराष्ट्र (Maharashtra)मंत्रिमंडळाचा शपथविधी सुमारे पस्तीस वर्षांनंतर भाजपच्या राजवटीत प्रथमच संघभुमी नागपूरात(Nagpur) झाला आहे. ते देखील विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला! या ऐतिहासिक घटनेचे काय महत्व आहे? याची चर्चा राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या या मंत्रिमंडळात अनेक जुन्या नेत्यांना बाजुला ठेवण्यात आले आहे तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यात अनेक नेते तर अनेक वर्षापासून पक्षसंघटनेत, आमदार म्हणून कार्यरत होते मात्र त्यांना कधी मंत्रीपद मिळेल असा विचार त्यांनी स्वत: देखील केला नव्हता मात्र यावेळी त्यांना अनपेक्षीतपणे संधी मिळाली आहे. या मागे संघ आणि केंद्रातील भाजपच्या वरिष्ठांचा समन्वय असल्याचे आता बोलले जात आहे.


संघाचे शतकमहोत्सवी वर्ष!

२०२५मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकमहोत्सव होत आहे. त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात संघाला अभिप्रेत कामकाज व्हावे असा विचार होणे स्वाभाविक आहे. त्याचवेळी सध्याच्या जोडतोडच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर संघाच्या धुरीणांनी हा शपथग्रहण सोहळा नागपूरच्या भुमीवर घेवून अनेक अर्थाने नव्या मनूचा उदय होत असल्याचे संकेत दिल्याचे जाणकारांचे मत आहे.
रा स्व संघाने नेहमीच देश, राज्य आणि धर्म यांच्या तत्वांचा पुरस्कार करत सेवाधर्माचा वस्तुपाठ घालून देत कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकार चालविताना संघाने थेट हस्तक्षेप यापूर्वीच्या काळात कोणत्याही भाजप प्रणित सरकारमध्ये केला नसला तरी यावेळी शंभर वर्षाचा प्रचंड संघर्षांचा टप्पा पार पाडत असताना “कात टाकली पाहिजे’ असा विचार आता पुढे आला असावा त्यातून मग सर्वच प्रकारचे लक्षात येतील असे काही बदल करण्यात येणार आहेत त्याचे संकेत नागपूरात होणा-या शपथविधीमधून देण्यात आले आहेत.

नव्या मनूचा उदय!

काही जाणकारांच्या मते गेल्या पाच वर्षात जे काही जोडतोडचे राजकारण झाले त्यामुळे संघाच्या राजकीय विचारसरणीला अनुसरून फारसा काही पल्ला गाठणे शक्य झाले नाही. त्यामुळे आता राजकीय सुंदोपसुंदी बाजुला ठेवून खऱ्या अर्थाने शिक्षण सहकार, संस्कृती, आरोग्य, सामाजिक समरसता, वनवासी कल्याण, युवक कल्याण, अश्या क्षेत्रामध्ये विचारधारेला पोषक कार्य व्हावे अश्या प्रकारची धोरणे राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी वर्षानुवर्षे बाजुला राहिलेल्या जुन्या संचातील भाजपमधील सहकाऱ्यांना संधी दिली गेली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्यांचा संघटनामध्ये आता अधिक महत्वाच्या कार्यात उपयोग करून घेतला जाण्याची शक्यता आहे.
नव्या मनूचा उदय होताना येत्या वर्षभरात संघटनेमध्ये सामाजिक समतोल असावा असा देखील विचार केला गेला असल्याने सत्ताकारणातून समाजकारणात ज्यांचा जास्त चांगला उपयोग करणे शक्य आहे अश्या रविंद्र चव्हाण यांच्या सारख्या नेत्यांना मंत्रिमंडळातून बाजुला ठेवण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या मुशीतून बाहेर पडलेल्या नितेश राणे यांच्या सारख्या लढावू बाण्याच्या तरुणांना संघ आणि भाजपच्या मुशीत घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आकाश फुंडकर(akash fundkar) यांच्या सारख्या नव्या पिढीला देखील यामध्ये आता योगदान देण्याची संधी देताना त्यांच्या पूर्वजांच्या कार्याचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असे सांगण्यात येत आहे. तर नागपूरात शपथ ग्रहण सोहळा घेण्यातून भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना महत्वाचा संदेश हा दिला गेला आहे की तुमच्या चांगल्या वाईट कामाचा लेखाजोखा आमच्याकडे आहे. तुमचा योग्य उपयोग कुठे आहे त्यानुसार संधी दिला जाते. मात्र आता जनतेच्या राज्य राष्ट्र आणि धर्माच्या उभारणीच्या कामात गंभीरपणे काम करणारांनाच महत्व असेल!


देवेंद्र३.०च्या पैलूना चमक!

त्यामुळे काँग्रेस पध्दतीच्या राजकीय धेय्य धोरणांना बाजुला ठेवून संघाला अभिप्रेत राष्ट्रनिर्माणासाठी नवा चमू तयार करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल प्रशासकीय अनुभवाचा वापर देखील त्यासाठी केला जाणार असून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक महत्वाच्या पैलूना त्यामुळे अधिक चमक देण्याचा प्रयत्न यावेळी देवेंद्र३.० मध्ये केला जाणार आहे.

भाजपसोबतच शिंदे यांच्या शिवेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले असून त्यापक्षांमध्ये देखील भविष्यात काही जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी समन्वय केला जाणार आहे. राजकीय अनिवार्यता लक्षात घेवूनच हे बदल केले जात असले तरी त्यात त्या त्या पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांना समतोल साधताना निर्णय घेण्याची मोकळीक राहिल याचा देखील विचार करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णत संघाचा वरचष्मा आहे असे किंवा थोपवलेले धोरण न राबविता काही गोष्टी ‘बनते बनते बन जाये’ अश्या प्रकारे हाती घेण्यात आल्या आहेत. याचे उदाहरण म्हणून मागील दोन वर्षात युवक आणि क्रिडा मंत्रालयात असलेल्या संजय बनसोडे यांच्या सारख्या नेत्यांना संधी मिळूनही या खात्यामध्ये फारकाही करता आले नाही. त्यामुळे त्यांना बाजुला करण्यात आले असून आता या विभागाच्या माध्यमातून नव्या मनूचा उदय कसा केला जावू शकतो त्याचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

जुन्या आजारावर कडू गोळीचा उतारा!

मात्र असे करत असताना राष्ट्रवादीत छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्या सारखे नेते नाराज झाले आहेत. भाजपमध्ये संजय कुटे किंवा शिंदे यांच्या शिवसेनेत नव्याने आलेल्या नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar)किंवा विजय शिवतरे(Vijay Shivtare) यांच्याकडून नाराजीचा सूर येताना दिसत आहेत. मात्र ज्यावेळी अश्या प्रकारे धोरण ठेवून फेरबदल केले जातात त्यावेळी काही प्रमाणात सर्वाचे समाधान होणे शक्य नसते. मात्र नेहमीचे तेच तेच राजकीय आवर्तन पहायची सवय झाल्याने ते सुरूवातीला वेगळे वाटण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे आजार नेमका काय आणि कुठल्या भागात आहे ते पाहून निष्णात वैद्य किंवा डॉक्टर औषध उपचार करत असतात. त्यावेळी काहीवेळा कटू औषध देखील दयावे लागते किंवा शरीराचा काही भाग शस्त्रक्रिया करुन काढावा लागत असतो. मात्र हे असे केल्याने ते जरी सुरूवातीला मनाजोगते नसले तरी किंवा कुणाला अभिप्रेत नसल्याचे दिसत असले तरी त्यातून अंतिम लक्ष्य काय आहे? याचा विचार करून बदल केल जातात. राज्य मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांच्या सारखा जुना जाणता नेता नसण्यामागे आता त्यांच्या माध्यमातून इतरमागासवर्गाचे नेते म्हणून ज्या पध्दतीचे राजकारण करण्यात येत होते तसे अभिप्रेत नसल्याचा नेमका संदेश गेला आहे. या शिवाय मागील काळात अनेकांना कायद्याचा धाक दाखवून कारवाई करण्याचा जो प्रघात होता तो न करता देखील योग्य पध्दतीने जागा दाखवता येवू शकते. हा संदेश या वेळच्या मंत्रिमंडळातील समावेशातून दिला गेला आहे. त्यामुळे केशवसुतांच्या तुतारी या काव्यातील जुने जावू द्या मरणालागूनी जाळूनी किंवा पुरूनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका या प्रसिध्द काव्य पंक्तीनुसार  पूर्वीपासून अजुनू सूरासूर तुंबळ संग्रामाला करीती सांप्रत दानव फार माजती देवावर झेंडा मिरवती! देवांच्या मदतीस चला तर! असे म्हटले आहे.

अधिवेशन विशेष
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
किशोर-आपटे
Social Media

2 thoughts on “अधिवेशन विशेष… सावध ऐका पुढल्या हाका! :  भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी!?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *