किशोर आपटे.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दुस-या दिवशीच्या कामकाजात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराचा प्रस्तावावरील चर्चेचा पहिला दिवस होता.या प्रस्तावावरील चर्चेला भाजपचे ज्येष्ठ सदस्य पराग अळवणी यांनी सुरूवात केली. या शिवाय औचित्याचे मुद्दे, विधेयकांचे कामकाज असे आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते.
सकाळी अकरा वाजता कामकाजाच्या सुरूवातीला अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नावे जाहिर केली. त्यात विजय रहांगडाळे, रमेश बोरनारे, शेखर निकम, दिलीप सोपल यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.त्यानंतर अध्यक्षांनी दिवंगत सदस्य दत्तात्रय महादेव राणे माजी मंत्री माजी विधानसभा सदस्यांच्या शोकप्रस्तावाचे कामकाज पुकारले. दिवसंगत दत्तात्रय राणे हे १९९० आणि १९९५च्या विधानसभेत सदस्य आणि मंत्री राहिले आहेत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदस्यांनी स्तब्ध राहून अभिवादन केले.
त्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचनांमध्ये कॉंग्रेस सदस्य नितीन राउत यांनी परभणी येथे झालेल्या घटनेत सोमनाथ सुर्यवंशी या दलित तरूणांचा पोलीसांच्या लाठीमारामुळे मृत्यू झाल्याबाबत प्रश्न काल शोकप्रस्ताव असल्याने मांडता आला नाही. मात्र आज त्यावर सभागृहात चर्चा घ्यायला हवी अशी विनंती केली. या विषयावर अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी उद्या नियम १०१ अन्वये याबाबत चर्चा घेण्यात येत असल्याने आता स्थगन नाकारण्यात आले आहेत असे सांगितले. मात्र नाना पटोले, आणि अन्य सदस्यांनी या विषयावर चर्चा घेण्याची आग्रही मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी उद्या चर्चा घेण्यात आली असल्याने आज स्थगन स्विकारता येणार नसल्याने पुन्हा सांगितले. त्यावर विरोधी सदस्य आक्रमक झाले. त्यानंतर नाना पटोले यानी या महत्वाच्या प्रस्तावावर आज तातडीने चर्चा घेणे आवश्यक होते. राज्यात जनतेच्या भावना क्षुब्ध आहेत त्यांच्याकडे योग्य तो संदेश सरकारच्या चर्चेतून जाणे आवश्यक असताना चर्चा घेत नसल्याबाबत कॉंग्रेस सदस्यांनी दिवसभरासाठी सभात्याग करत असल्याचे सांगितले.
त्यानंतर अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी औचित्याच्या मुद्यांचे कामकाज पुकारले त्यात अभिमन्यू पवार, संदिप क्षीरसागर, नमिता मुंदडा अमशा पाडवी भीमराव तापकीर सुमित वानखेडे, किरण लहामटे, महेश लांडगे निलेश राणे, अबु आझमी, मनिषा चौधरी, सुलभा खोडके, भास्कर जाधव, काशिनाथ दाते, हिरामण खोसकर,अमीत साटम, राम कदम, अजय चौधरी, संजय पोतनीस, संजय केळकर देवेंद्र कोठे.या सदस्यानी त्यांच्या मतदारसंघातील तातडीच्या प्रश्नांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्नाची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करण्याचे सदस्यांना आश्वासन दिले. औचित्याच्या मुद्यानंतर अध्यक्षांनी विधेयके पटलावर मांडण्याचे कामकाज पुकारले. त्यात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मुद्रांक सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र वस्तु व सेवा कर सुधारणा विधेयक मांडले.
त्यानंतर भाजप सदस्य पराग आळवणी यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावा वरील चर्चेला सुरूवात केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानले. राज्यपालांच्या अभिभाषणातून महायुती सरकारच्या मागील तीन वर्षांच्या कामगिरीचा गौरव झाल्याचे ते म्हणाले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या आभार प्रस्तावाचा विरोध करत असल्याचे सांगताना नव्या सरकारच्या सत्तास्थापनेचा दावा केला नसताना आझाद मैदान येथे शपथविधीची तयारी कशी करण्यात आली, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केली. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. अतुल भातखळकर यांनी त्याच्या भाषणातील राज्यपालांबाबतचे अनावश्यक उदगार वगळण्याची मागणी केली. त्यावेळी तालिका अध्यक्ष रमेश बोरनारे यांनी तपासून ते वगळण्यात येतील असे सांगितले. मात्र त्यानंतरही सत्ताधारी सदस्यांकडून करण्यात आलेल्या टिपणीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी आक्षेप घेतले. त्यांनतर भास्कर जाधव यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी उध्दव ठाकरे यांच्या सरकारने सर्वात प्रथम केंद्र सरकारकडे लावून धरल्याचा उल्लेख केला. त्यावर देखील सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेत महायुती सरकारने या निर्णयासाठी यशस्वी कामगिरी केली असल्याचे सांगितले.
त्यानंतर भाजपचे सदस्य सुरेश धस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अनेक मुद्यावर सविस्तर माहिती देत राज्यपालांचे आभार व्यक्त केले. तुकाराम काते यानी मुंबईतील झोपडपट्ठ्यांच्या विकासाची योजना राबविण्याबाबतच्या प्रश्नावर मुद्दे मांडले.
रईस शेख यांनी हातमाग यंत्रमाग उद्योगाबाबत मुद्दे मांडले. प्रविण दटके यांनी मतदारसंघातील प्रश्नावर मुद्दे मांडले. संजय गायकवाड यांनी वैनगंगा पैनगंगा प्रकल्पासह अन्य प्रकल्पांच्या विकासाचे मुद्दे मांडले. सिंचनामध्ये ग्रामिण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेखर निकम यानी महायुती सरकारकडून राबविण्यांत आलेल्या योजनांबद्दल आभार व्यक्त केले. अतुल भातखळकर यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज असल्याचे सांगितले. मशिदीवरील भोंगे देखील नियंत्रीत करण्याबाबत त्यानी मुद्दे मांडले. मुंबईत महात्मा फुले जनआरोग्य रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत त्यांनी मागणी त्यांनी केली. निलेश राणे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना राजकोट येथील पुतळा दुर्घटनेबाबत सांगितले की माजी सदस्य दुर्घटना घडल्यावर लगेच कसे पोचले? त्यामुळे पुतळा पडला की पाडला असा संशय येतो त्यामुळे याबाबत चौकशी झाली पाहिजे. असे ते म्हणाले. जपान सारखेच महाराष्ट्र देखील उत्पादक राज्य कसे होईल यावर लक्ष द्यायला हवे असे ते म्हणाले. बांबू लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी असेल तर माझ्या कोकणातील मतदारसंघ हा योग्य आहे. मात्र वनखात्याकडून वानरांचा बंदोबस्त केला पाहिजे असे ते म्हणाले. पर्यायी इंधन म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन द्यायचे असेल तर याकडे लक्ष द्यायला हवे. असे राणे म्हणाले. आरोग्यवसेवेसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
त्यानंतर राज्यातील जि प पं समित्यांच्या निवडणूका तात्पुरत्या पुढे ढकलण्याबाबतचे विधेयक क्र २२ मतास टाकण्यात आले. त्यानंतर विधेयक क्रमांक २३ देखील संमत करण्यात आले. श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक त्यानंतर चर्चेसाठी पुकारण्यात आले. त्यावर बोलताना ठाकरे गट शिवसेनेकडून बोलताना गटनेते भास्कर जाधव यांनी विरोधीपक्षांच्या सदस्यानाही या न्यासावर सदस्य म्हणून असायला हवेत असे ते म्हणाले. लोकप्रतिनिधी म्हणून सध्या केवळ सत्ताधारी सदस्य आणि समर्थक यांची वर्णी लावली जाते मात्र १५ सदस्य निवडताना त्यांचे नेमके निकष ठरवले जावेत असे ते म्हणाले. मंदीराकडे येणा-या देणगीच्या पैशाचा विनियोग कोणत्या कामांसाठी व्हावा यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर हे विधेयक मतास टाकण्यात आले. त्यानंतर नगर परिषद निवडणूक पुढे ढकलण्याबाबतचे विधेयक पुकारण्यात आले. हे विधेयकही मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक त्यानंतर चर्चेसाठी पुकारण्यात आले. झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी या विधेयकात सू्ट देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. कोकणातील झाडे तोडण्यासाठी शेतक-याचा विचार हा कायदा करताना करावा असे भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी केला. मुख्यमंत्र्यांकडून याबाबत खुलासा करण्यात आला की सर्वसदस्यांकडून याबाबत विचारविनिमयाची गरज असल्याने विधेयक तात्पुरतं स्थगित ठेवण्यात येईल असे ते म्हणाले. त्यानंतर महाराष्ट्र बदल्यांचे नियमन विधेयक पुकारण्यात आले. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडून याबाबतचे विधेयक मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरु होती.
अधिवेशन विशेष… सावध ऐका पुढल्या हाका! : भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी!?