मुंबई : ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार सुप्रिया अय्यर(Novelist Supriya Iyer) यांच्या निधनाने अनेक महिला लेखिका घडविणार्या एका ज्येष्ठ साहित्यिकेला आपण मुकलो आहोत, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
मराठी साहित्यात स्त्रीलेखनात स्वत:ची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. केवळ लेखिका नाही तर अभिव्यक्ती संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना लिहिते केले. साहित्य क्षेत्रातील अनेक आयोजनांत त्यांचा पुढाकार असायचा. याच अभिव्यक्तीच्या माध्यमातून साहित्य संमेलने त्या घ्यायच्या. स्वत: प्रतिथयश झाल्यावर नवी पिढी निर्माण करणे, हे काम फार कमी लोकांना जमते, ते त्यांनी केले. साहित्यसेवेसोबतच समाजसेवेतही संस्थात्मक कार्य करुन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. वैद्यकीय क्षेत्र असेल, एड्सपीडितांसाठी केलेले काम असेल, त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ती सदैव जिवंत असायची. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.