‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणी नुसार अनेक व्यक्तींच्या झोपण्याची वेगळ्या पद्धती आणि प्रकार आहेत. काहींना सरळ झोपायला आवडतं, काहींना कुशीवर, तर काही व्यक्तींना पोटावर.
काहींना झोपताना संपूर्ण अंधार लागतो, तर काहींना मिणमिणता प्रकाश आवडतो. त्यामुळे अनेकांच्या बेडरूम मध्ये नाईट लॅम्प हा असतो. एक मात्र नक्की की, दुपारच्या झोपे पेक्षा रात्रीची झोप ही फार महत्त्वाची असते. कारण रात्री अंधार जास्त असतो. आता काही जण म्हणू शकतील की, ते झोपताना पडदे लावून अंधार करून झोपतात. म्हणजेच, झोपण्यासाठी अंधार हा महत्त्वाचा आहे आणि याला शास्त्रीय आधार सुद्धा आहे. अंधारात झोपण्याचे शरीराला अनेक फायदे होतात, मुख्य म्हणजे आपल्या शरीराची सर्केडियन लय सुधारते.
सर्केडियन ताल
रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी अंधार आवश्यक आहे. कारण शांत झोप आणि उजेड यांचा परस्पर संबंध आहे. आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ २४ तास कार्यरत असतं, ज्याला सर्केडियन ताल किंवा लय म्हणतात. शरीरातलं हे नैसर्गिक घड्याळ आपल्याला दिवस आणि रात्रीच्या शारीरिक क्रिया सुरू ठेवण्यास मदत करतं. जेव्हा हे घड्याळ व्यवस्थित काम करतं, तेव्हा आपल्याला झोप चांगली येते. अंधारात झोपल्याने, सर्केडियन ताल नैसर्गिक पद्धतीने कार्य करते, त्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते. पण जर आपण लाईट सुरू ठेवून झोपलो, तर सर्केडियन ताल बिघडते आणि नीट झोप येत नाही. त्यामुळे अनेकांना लाईट असेल तर झोप येत नाही. म्हणूनच उजेड असताना काही व्यक्ती डोळ्यावर मास्क लावून झोपतात, जेणेकरून त्यांच्या डोळ्यांवर प्रकाश येणार नाही, आणि त्यांना शांत झोप लागू शकते.
लाईट लावून झोपल्यावर काय होतं?
जेव्हा आपण लाईट लावून झोपतो, तेव्हा प्रकाशामुळे मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकावर परिणाम होतो. मेलाटोनिन हे एक असं संप्रेरक आहे ज्यामुळे शांत झोप लागते. अंधारात मेलाटोनिन चांगल्या प्रमाणात तयारं होतं, जेणेकरून शांत झोप लागू शकते. मात्र उजेडामुळे मेलाटोनिनचं उत्पादन कमी होतो, ज्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. आपल्या मेंदूत एक सर्केडियन पेसमेकर(Circadian Pacemaker) असतं. जे झोप, भूक, हार्मोन्सची पातळी आणि शरीरातील विविध प्रक्रियांवर नियंत्रण ठेवतं. जेव्हा आपल्या डोळ्यावर नैसर्गिक किंवा कृत्रिम प्रकाश पडतो, तेव्हा हा पेसमेकर सक्रिय होतो आणि मेंदूला एक संकेत पाठवतो की ही रात्र नसून दिवस आहे. त्यामुळे सर्केडियन लय बदलते आणि शरीर अलर्ट होऊन शांत झोप येत नाही.
अंधाराचा फायदा काय?
ज्या ठिकाणी आपण झोपतो त्या ठिकाणी नाईट लॅम्प, टीव्ही किंवा मोबाईलचा प्रकाश येत असेल, तर त्याचा थेट परिणाम सर्केडियन तालावर होतो. रात्र असूनही, झोपेची वेळ जवळ येऊनही हा प्रकाश मेंदूला एक संदेश पाठवतो की, आता रात्र नसून दिवस आहे. त्यामुळे शरीरातलं नैसर्गिक घड्याळ गोंधळून जातं आणि झोप येण्यात अडचण येते. म्हणून झोपण्या पूर्वी मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर करू नये. जेणेकरून सर्केडियन ताल सुस्थितीत कार्य करेल. अंधारात झोपण्याचा आणखी एक फायदा म्हणजे मनःशांती मिळते. झोपण्याच्या ठिकाणी जेव्हा पूर्ण अंधार असतो, तेव्हा शरीर आणि मेंदू दोघांनाही आराम मिळतो. म्हणूनच झोपून उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)