तुमच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, तात्काळ राजीनाम द्या! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
मुंबई : स्व. संतोष देशमुख(Santosh Deshmukh) यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनाम द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ(Harsh Vardhan Sapkal) म्हणाले की, फक्त धनंजय मुंडेच्या(Dhananjay Munde) राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केले नाही हा खरा प्रश्न आहे. या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हिडीओ, पुरावे सुरुवातीपासून पोलिसांकडे होते म्हणजेच गृहमंत्री व सरकारकडे होते. या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही दोन महिने सरकार धनजंय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे या टोळीला सरकारचा पाठिंबा होता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबायचे होते हे स्पष्ट होते.
देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमांनी दिलेली साथ यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले. अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झाले असते. आता आपली कातडी वाचविण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती अशा बातम्या पसरवून अंग झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. हा त्यांचा कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही, त्यांचे सत्य जनतेसमोर आले आहे, त्यामुळे त्यांनी पायऊतार व्हावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.