मुंबई: आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारे भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harsh Vardhan Sapkal)यांनी केला.
महाराष्ट्र आता थांबणार नाही, भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार!
राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की राज्याचा हा अर्थसंकल्प फक्त शहरांसाठी बनवलेला आहे का? अर्थमंत्र्यांच्या भाषणात मेट्रो उड्डाणपूल भुयारी मार्ग, विमानतळं, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा यांचाच बोलबाला आहे. पण राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या महागाई, बेरोजगारी या मूलभूत समस्या सोडवण्याबाबत सरकारकडे काही ठोस धोरण किंवा उपाययोजना नाही. आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी बद्दल एक शब्द ही नाही. शेतक-यांना मोफत वीज देण्याची घोषणा सुद्धा पोकळ असून आजही शेतक-यांना वसुलीसाठी वीज बिले पाठवली जात आहेत. शेतकरी सन्मान निधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले पण अंमलबजावणी नाही. शेतक-यांच्या मेहनतीमुळे कृषीक्षेत्रामुळे विकास दर वाढला पण सरकारने शेतक-यांच्या मालाला भाव दिला नाही त्यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकरी कर्जमाफी, शेतमालाच्या हमीभावाबाबत घोषणा नाही, शेतक-यांना मोफत विजेची घोषणा फसवी.
शेतक-यांचा विरोध असतानाही शक्ती पीठ महामार्गाचा अट्टाहास करून भाजपा युती सरकार शेतक-यांना उद्ध्वस्त करू पहात आहे. समृद्धी महामार्गाने कोणाची समृद्धी झाली हे सर्वांना माहित आहे. त्याच लोकांची समृद्धी पुन्हा व्हावी यासाठी सरकार आपली शक्ती वापरत आहे. सरकारने जाहीर केलेले प्रकल्प, गुंतवणूक ही फक्त मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक या भागापुरताच असून राज्याचा मोठा भाग विकासापासून वंचितच आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात साधा उल्लेखही नाही.
लाडक्या बहिणींना कोडग्या सरकारने फसवले!
लाडकी बहीण योजनेतून महिन्याला २१०० रुपये देण्याची घोषणा आज अर्थसंकल्पातून होईल अशी अपेक्षा ठेवून बसलेल्या लाडक्या बहिणींची सरकारमध्ये बसलेल्या कोडग्या भावांनी निराशा केली आहे. जवळपास १० लाख भगिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे. उद्योग धंद्याची वाढ ५.६ टक्क्यांवरून ४.९ टक्क्यांवर घसरली आहे. सेवा क्षेत्र ही घसरले आहे त्यामुळे रोजगार कमी झाले आहेत. परकीय गुंतवणूक वित्तीय क्षेत्रात आली आहे, औद्योगीक क्षेत्रात नाही ही अत्यंत काळजी वाढवणारी बाब आहे त्याबाबत अर्थसंकल्पात काही ठोस धोरण नाही.
राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, महाभ्रष्ट महायुतीने राज्याला दिवाळखोर केले.
आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey)अहवालानुसार फक्त मुंबई पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर , कोल्हापूर या जिल्ह्यांची परिस्थिती चांगली आहे पण बाकी जिल्ह्यांची अवस्था दयनीय आहे. या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी आहे. ५० लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ऐकायला चांगले पण हे आकडे फक्त कागदावरच राहणार आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांच्ये फौजा आहेत. त्यांच्या हाताला नोकरी रोजगार नाही राज्यातील बेकारीचे चित्र अत्यंत भयावह आहे. राज्य सरकारची अडाच लाख रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी काहीच धोरण नाही.
अर्थसंकल्पाची सुरुवात करताना अर्थमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन केले. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाची अद्याप वीट रचली नाही आणि हे सरकार आग्र्यात स्मारक उभे करण्यास निघाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली पण याच महापुरुषांचा अपमान करणा-या कोरटकर, सोलापूरकर व त्यांच्या पिल्लावळीवर कारवाई केली जात नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.