धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यावी : नाना पटोले

सरकारमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस वाद, शिंदे सरकारने घेतलेले अनेक निर्णय फडणवीसांकडून बंद.

मुंबई :  कोणते मटन(Mutton) कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे भरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या मंत्र्याला तंबी द्यावी, असे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole)म्हणाले की, कायदे करणे हे सरकारचे काम आहे पण एखादा मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. हलाल मटन विकत घ्यायचे की आणखी कोणते व ते कोणाकडून घ्यायचे हे मंत्र्यांनी सांगू नये, हे काम त्यांचे नाही. महाराष्ट्रात धार्मिक मुद्दे उपस्थित करून सामाजिक शांतता भंग करण्याचा उद्योग काही लोक करत आहेत, त्याची दखल सरकार व मुख्यमंत्री यांनी घ्यावी. मंत्रीपदाची जी शपथ घेतली त्याचे पालन करावे. धर्माधर्मा मध्ये वाद निर्माण करुन महाराष्ट्राला तोडू नका, असेही पटोले यांनी बजावले आहे.

भोंग्यांसंदर्भात कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजवणी करा.

भोंग्याच्या आवाजासंदर्भात मा. सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे तो कोणत्या एका धर्मासाठी नसून भोंग्याच्या आवाजासंदर्भात आहे, त्याचे पालन केले पाहिजे. एकाच धर्मासाठी ते लागू केले जात असेल व त्यातून नवे वाद उभे राहतील. सुप्रीम कोर्टाच्या आदेशनाचे पालन जे अधिकारी करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. भोंग्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही, त्यामुळे गैरसमज पसरवू नका, असे आवाहनही पटोले यांनी केले.

सरकारमध्ये शिंदे विरुद्ध फडणवीस वाद…

एकनाथ शिंदे (Eknath Shinde)सरकारने घेतलेले निर्णय व सुरु केलेल्या योजना फडणवीस सरकार बंद करत आहेत. शिंदे यांच्या आमदारांना दिलेली सुरक्षा फडणवीस सरकारने काढून घेतली आहे पण त्याचवेळी भाजपाच्या बगलबच्च्यांना मात्र वाय प्लसची सुरक्षा दिलेली आहे. आनंदाचा शिधा, शिवभोजन योजनेलाही कात्री लावण्याचे काम केले जात असून बजेटमध्ये या योजनांसाठी निधीची तरतूद केल्याचे दिसत नाही. शिंदे विरुद्ध फडणवीस(Shinde vs Fadnavis) या वादातून राज्यातील जनतेचे मात्र नुकसान होत आहे असेही नाना पटोले म्हणाले.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *