मंकी बात…

सध्या विरोधीपक्ष नेत्यांचे काम करत आहेत पक्षविरोधी नेते? : सूत्रांची  माहिती

‘तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू मै, तेरी मासुम सवालो से परेशान हू मै’ अश्या शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर (अधीर नव्हे बरे!) मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील सल आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत विधानसभेत व्यक्त केली आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे दोन सप्ताहाचे कामकाज झाले आहे. राज्याचा प्रचंड तुटीचा अर्थसंकल्प मांडून झाला आहे. त्यावर आता चर्चा सभागृहात सुरू आहे. या चर्चेतून सत्ताधारी बाजूच्या जुन्या जाणत्या सदस्यांचा सूर ऐकताना सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील नव्या जुन्या जाणत्या नेणत्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे ते मांडायचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वर भाजपच्या खास शैलीत हे देखील सांगून टाकले आहे की मंत्रीपद मिळाले नाही, निर्णय प्रक्रियेत महत्वाचा सहभाग नसल्याने आपण नाराज असल्याने हे काही बोलत नसून ज्या उद्दीष्टांसाठी भाजप हा इतरांपेक्षा वेगळा राजकीय पक्ष निर्माण झाला त्याच्या उद्देशांनुसार तो चालला पाहिजे.
DevendraFadnavis

भाजपच्या अंतर्गत खदखद ?

कधीकाळी वित्तमंत्री राहिलेल्या जयंत पाटील(Jayantpatil) मुनगंटीवार यांच्या भाषणातून सभागृहात अर्थसंकल्पाची नेमकी मेख काय ते बाहेर येणार म्हणून सा-यांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे होते. जयंत रावांनी काहीश्या संयमीपणे भाषणातून तुकाराम गायब झाला पण एकनाथालाही का दूर करताय असा दुखत्या रगवर हात ठेवलाच. पण सनदी अधिका-यांच्या मदतीने राज्य चालविणा-या सरसकारच्या सनदी अधिका-यांना सातवा वेतन आयोगासाठी हजारो कोटींची तरतूद पटकन केली जाते मात्र त्यांच्याकडून सभागृहात जबाबदारी म्हणून अलिकडे अधिकारी गँलरीत उपस्थितीच बंद झाली आहे या बाबूशाहीकडे मुनगंटीवार यानी नेमके बोट ठेवले आहे. शेतक-यांना कर्जमाफीसाठी पाच दहा हजार कोटी रूपये देणे एवढे काही अशक्य नव्हते असे सुनावताना त्यांनी पिकविम्याच्या गैरवाजवीपणावरही बोट ठेवले. तिच गोष्ट एकनाथ खडसे, अंबादास दानवे, अनिल परब यांनी वरिष्ठ सभागृहात केली. विरोधीपक्ष नेत्यांपेक्षा भाजपचे पक्ष विरोधी नेते मात्र भारी पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे! महायुती सरकारमध्ये सहभागी तीन घटकपक्ष आहेत त्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शिस्तप्रिय स्वयंसेवकांचा पक्ष मानला जाते मात्र यावेळी पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनातून भाजपच्या अंतर्गत खदखद वेगळ्यारितीने बाहेर पडत असल्याचे दिसत आहे असे जाणकारांचे मत आहे.
दूरचे आणि जवळचे आतले आणि बाहेरचे?
या जाणकारानी सांगितले की, पक्षात सध्या नवे आणि जुने असे दोन प्रकारचे नेते कार्यकर्ते आहेत. त्यात बाहेरून आलेल्यांना सध्या संधी पटापट मिळत असून जुन्या लोकांना आता त्यामानाने स्थान मिळत नसल्याची खंत आहे. पक्षाच्या मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटना यामध्ये सध्या अनेकांना सत्तेचा वाटा मिळत नसल्याची भावना असल्याचे या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही खदखद हळूहळू बाहेर दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DevendraFadnavis)  यांच्या भोवती जे जवळचे समजले जाणारे नेते आहेत त्यांच्यात प्रसाद लाड, प्रविण दरेकर, चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, परिणय फुके, अभिमन्यू पवार, सुमित वानखेडे, नितेश राणे, जयकुमार रावल, मोहित कंभोज,विश्वास पाठक, गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत अश्या डझनभर नेत्यांचा उल्लेख केला जातो. यातील बहुतांश लोक अलिकडच्या काळात मूळ विचारसरणीच्या बाहेरचे लोक आहेत. तर अलिकडे पक्षात आलेल्या अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, रणजीत निंबाळकर, नाशिकचे फरांदे, हिरे, नगरचे कोल्हे, काळे, कर्डिले पाचपुते,पिचड, राजळे, बीडचे धस, मुंदडा, पालघरचे गावित, नंदूरबारचे गावित मराठवाड्यातील बंब, लोणीकर, विदर्भात कुटे, भांगडिया,राणा असे बरीच मोठी यादी आहे. या नेत्यांमध्ये काहीजण आपली खंत बोलून दाखवतात तर काहीजण एकदम मौन राहून आपले दु:ख मनातल्या मनात सहन करतात असे या सूत्रांचे मत आहे.

काही बोलायचे आहे पण बोलणार नाही

तर विषय असा आहे की अधिवेशना निमित्त सध्या सत्तेत निर्णय प्रक्रियेत ज्यांचा वरचष्मा आहे त्या भाजपच्या फडणवीस यांच्या जवळच्या आणि दूरच्या अश्या दोन भागात विभागल्या गेलेल्यांमध्ये आता वैचारीक ओढाताण सुरू आहे. अनेकांना सध्याच्या अनेक गोष्टी पटल्या नाहीत तरी मान्य कराव्या लागत असल्याची खंत आहे. अनेकांना संधी हवी आहे मात्र त्यांना ती मिळत नाही आणि मिळणार नसल्याची खंत आहे. ही खंत मग काही जण व्यक्त करताना दिसतात. इतके की, सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना एका प्रसंगी बोलताना आपण कायमच त्या पदावर राहून आपल्यामनाप्रमाणे निर्णय घ्यावे असे म्हणत स्पष्ट नाराजी बोलून गेले. सूत्रांच्या मते सध्याच्या सरकारमध्ये पहिल्या दिवसांपासूनच ही खदखद आहे आणि ती राष्ट्रवादी आणि शिवेसने च्या तुलनेत भाजपमध्ये सर्वाधिक आहे. याचे कारण मुंबईत अतुल भातखळकर, योगेश सागर, मनिषा चौधरी, पराग आळवणी किंवा ठाण्यात संजय केळकर, रायगडमध्ये प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील अश्या तीन चार वेळचे आमदार राहिलेल्यांना पक्षात आणि सरकारमध्ये सत्तेचा लाभ देणारे महत्वाचे स्थान नाही. वरिष्ठ सभागृहातले सदस्य एकनाथ खडसे यांच्या सारखी आपली अवस्था होवू नये म्हणून अनेकजण काही बोलायचे आहे पण बोलणार नाही अश्या भुमिकेत राहतात असे या सूत्रानी सांगितले.

बोलायची संधीच दिली जात नाही

याचे ताजे उदाहरण म्हणजे सत्ताधारी सदस्यांचा एक प्रस्ताव दर मंगळवारी सभागृहात चर्चेला असतो या शिवाय अशासकीय कामकाज दर शुक्रवारी किंवा कामकाजाच्या शेवटच्या दिवशी असते. मात्र दोन्ही आठवड्यात सत्ताधारी पक्षांचा चर्चेचा प्रस्ताव दररोज कामकाजात दाखविला जातो मात्र त्यातील एकही चर्चा काही घेतली जात नाही. अशासकीय कामकाजात सदस्य महत्वाच्या विषयांवर त्यांची मते मांडून नवे कायदे, नव्याने काही लोकोपयोगी सूचनांमध्ये सरकारला निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात मात्र या सदस्यांना सभागृहात दोन आठवडे झाले तरी बोलायची संधीच दिली जात नाही.
तीच अवस्था सध्या मंत्रिमंडळात असलेल्या  पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, विखे पाटील, गिरिश महाजन, अतुल सावे अश्या भाजपच्या जुन्या नेत्यांची आहे. असे या सूत्रांनी सांगितले. सध्या भाजपमध्ये त्यामुळे खदखद असून सर्वाच्या मनात तुझसे नाराज नही जिंदगी. . .  हे नितीन गडकरी यांचे आवडते गाणे आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधीपक्ष नेता नव्हे पक्ष विरोधी नेते?

या सूत्रांच्या मते येत्या काही दिवसांत या नाराजीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पावर विरोधकांनी ज्या मुद्यावर सरकारला घेरले त्यात वडेट्टीवार, जयंत पाटील भास्कर जाधव नाना पटोले यांचे भाषण अध्याऋत समजले पाहिजे. मात्र सुधीर मुनगंटीवार म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका ३ वर्ष न घेतल्याने केद्रीय वित्त आयोगाचे पैसेच येत नाहीत त्यामुळे मागील वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केलेला सुमारे २७ ट्क्के निधी मिळू शकला नाही. तर सुरेश धस यानी ग्रामिण महाराष्ट्रात १५७  विधानसभा मतदारासंघाचे तालुके आहेत आणि शहरी भागात १३१ आहेत त्यांचा समतोल विकास व्हावा असे निधीचे वाटप का होत नाही असा सवाल केला आहे. तर ब बनराव लोणीकर यानी मराठवाडा विदर्भाच्या विकासासाठी पाण्याचे समन्यायी वाटप, वैधानिक विकास मंडळे हवी असे म्हणत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. अगदी निलेश राणे यांच्या सारख्या पहिल्यांदा सदनात आलेल्या सदस्याने मी लोकसभा पाहिली आहे. येथे दहा हजार कोटीच्या मागण्या मांडून चर्चा हजार कोटींची का करता आणि मंजूरी घेताना पाच हजार कोटीच्या मागण्या विनाचर्चा मंजूर कश्या करता असा रोकडा सवाल केला आहे. त्यामुळे राज्याला सध्या विरोधीपक्ष नेता नसला तरी तीनही पक्षांमध्ये पक्ष विरोधी नेते उदयाला आले असून  त्यांच्याकडून लोकशाही आपला आवाज बुलंद करत राहील असा विश्वास या सूत्रानी व्यक्त केला आहे.
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे

 

आनंदाचा शिधा शिवभोजन बंद! शिंदेकडील खात्यांना सर्वात कमी निधी? भाजपकडून शिंदेना आवर घालण्याची योजना उघड : सूत्रांची माहिती!

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *