सुशांतसिंह राजपूत प्रकरण : सीबीआय तपासाच्या निकालाची गृहमंत्र्यांना प्रतिक्षा

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशी करणारी केंद्रीय संस्था सीबीआयवर आता विलंब झाल्याचा आरोप होत आहे. या आरोपांदरम्यान, महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ते देखील निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुशांतच्या कुटुंबियांनीही सीबीआयच्या चौकशीला उशीर झाल्याबद्दल असमाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची मुंबई पोलिस व्यावसायिक पद्धतीने चौकशी करत होते, पण अचानक हा खटला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आला. आम्ही त्यांच्या चौकशीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहोत. लोक विचारत आहेत की त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या केली गेली. या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही तपासणीच्या निकालाची वाट पाहत आहोत.

14 जून रोजी सुशांतसिंह राजपूत यांचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी सापडला. सुरुवातीच्या अहवालांच्या आधारे मुंबई पोलिसांनी त्याने आत्महत्याच केल्याचे समजले, शवविच्छेदन अहवाल आणि व व्हिसेरा अहवालाद्वारेही त्याची पुष्टी झाली. पण सुशांतचे कुटुंबीय आणि चाहते हे आत्महत्या म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर केंद्र सरकारने बिहार सरकारच्या शिफारशीवरून हा तपास सीबीआयकडे सोपविला.

सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही तयार केली गेली. मीडिया रिपोर्टनुसार एम्सच्या टीमला मृत्यूचे नेमके कारणही कळू शकले नाही. तसेच, अद्याप हा अहवाल अधिकृतपणे जाहीर झाला नाही. सुशांतच्या मृत्यूच्या तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अजून चित्र स्पष्ट न झाल्यामुळे चाहत्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर या मोहिमेला वेग दिला आहे, त्यामुळे ट्विटरवर #AIIMSBeFairWithSSRReport असा हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात झाली. त्याचबरोबर सुशांतचा मित्र गणेश हिवारकर आणि माजी कर्मचारी अंकित आचार्य हे दोघे उपोषणावर बसणार असल्याचे वृत्त आहे.

 

Social Media