रात्र वैऱ्याची आहे! भारतीय नागरिका, राजा सावध रहा!
जन्नत ए कश्मीर(Jannat-e-Kashmir) मधील पहेलगामच्या बेसन पठारावर पर्यटनासाठी गेलेल्या अश्राप नागरिकांवर अनपेक्षितपणे अतिरेक्यांचा जिवघेणा हल्ला झाला. या दुर्दैवी हल्ल्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक नागरिक बळी पडले आहेत. देशात नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून अतिरेक्यांचे अनेक हल्ले झाले, त्यात अनेक सैनिक शहिद झाले. मात्र आताचा हल्ला वेगळ्या प्रकारचा होता हे मान्य करावे लागेल. नि:शस्त्र नागरिकांना त्यांचा धर्म कोणता? हे विचारून आणि त्यानंतरही खात्री न पटल्याने त्यांची खतना झाली आहे की नाही याची खातरजमा करुन त्यांचा त्यांच्या बायको-मुलांसमोरच दिवसाढवळ्या नृशंसपणे खून करण्यात आला आहे. ही घृणास्पद कृती करणारे पोरसवदा वयाचे तरुण होते, त्यांच्याकडून हे कृत्य करवून घेणाऱ्यांचे मनसुबे मात्र खूप खूनशी आणि पाताळयंत्री (कोल्डबल्डेड) म्हणतात तश्या प्रकारचे आहेत हे त्यातून स्पष्ट होते. या देशात धार्मिक यादवी व्हावी, देशभरातील लोकांचे काश्मीरबद्दलचे मत बदलावे, त्यांचे पर्यटन(Tourism), स्थानिकांसोबत मिसळणे बंद व्हावे यासाठी दिर्घविचारपूर्वक हे घडविण्यात आले आहे. यातून पुन्हा काश्मीरी बेरोजगार होतील, भरकटण्यासाठी मजबूर होतील हा मनसुबा तर आहेच. पण सामान्य नागरिक जिवाच्या भितीने पुन्हा पर्यटनाला येणार नाहीत जेणेकरुन काश्मीर (Kashmir)पुन्हा एकदा देशापासून तोडण्याची ही गहिरी साजीश आहे.
देशाच्या एकजुटीवरचा हल्ला
या काळ्याकुट्ट मनसुब्यांचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे, त्याही पेक्षा या मनसुब्यांना उधळून लावायचे असेल तर त्यांना जे हवे आहे ते कधीच घडू देता कामा नये हे देखील लक्षात घ्यायला हवे. देशातील शांतता, बंधुभाव, भाईचारा नष्ट होवू देता कामा नये. त्यासाठी धार्मिक वाद विवाद, जातीय तेढ बाजुला ठेवून एकजूट व्हायला हवे. तसे प्रयत्न वर्तन सर्वांनीच करायला हवे. हा काही राजकीय विषय नाही. हा देशावरचा देशाच्या एकजुटीवरचा हल्ला आहे त्याला एकजूट होवूनच तोंड दिले पाहिजे. वेळोवेळी मुंबई असो किंवा देशातील कोणताही भाग असो अश्या प्रसंगी सामान्य नागरिकांनी ज्या समजूतदारपणाचे माणुसकीचे तसेच धैर्य आणि साहसाचे दर्शन घडविले तसेच यावेळी देखील झाले आहे. या देशाच्या साध्या घोडेवाल्याने या अतिरेक्यांचा समोरा समोर निशस्त्र सामना करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या मनसुब्याना घोडे लावले आहेत! त्या आदिल (Adil)नावाच्या काश्मीरी तरुणाने आपल्या कृतीतून जीवाचे बलिदान देवून घृणास्पद कारस्थांन्यांना हेच दाखवून दिले आहे. जसे मुंबईच्या हल्ल्यात शहिद तुकाराम ओंबळे(Tukaram Omble) या पोलीस शिपायाने दाखवून दिले होते. आता वेळ प्रत्येक जबाबदार नागरिकांची आहे.सुजाण सुशिक्षीत जनतेने आपल्या आजुबाजूला जागरूकतेने परस्पर सदभावना बंधुत्वाची भावना बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.

जबाबदारीचे भान ठेवून वागायची ही वेळ
देशभक्ती दाखविण्याची हीच वेळ आहे. पण कुण्या धर्माच्या प्रार्थनास्थळासमोर जावून, कुणा अल्पसंख्य लोकांना धमकावून, त्यांच्या समोर उत्पाती वक्तव्य कृती करून आपण पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या(Pakistani terrorists) मनसुब्यांना खतपाणीच घालत आहोत याचे भान काही अति उत्साही राजकीय नेते कार्यकर्त्यांना राहत नाही. या हत्याकांडाचा बदला घेताना दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना कायमची अद्दल घडवण्यासाठी केंद्र सरकारला सर्वच विरोधीपक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. येत्या महिनाभरात केंद्र सरकारकडूनही त्याबाबत ठोस कृतीची अपेक्षा केली जात आहे. काश्मीरमध्ये घडलेल्या प्रसंगात सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालय आणि संरक्षण खात्याची आहे. मात्र काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला(Omar Abdullah) यांनी तर विधानसभेचे विशेष अधिवेशन घेवून निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्या संदर्भात देशवासीयांची माफी मागितली आहे. ही वेळ मन मोठ करुन समजूतदारपणा दाखविण्याची आहे. नफरती चिंटूकडून मात्र आता आगळीक होता कामा नये देशातील वातावरण सौहार्दाचे आणि शांतीचे रहायलाच हवे. कोणतेही धार्मिक जातीय वाद उकरून काढून हिंसा करण्याचे कारस्थान करणाऱ्यांना सुजाण लोकांनी रोखायची ही वेळ आहे. किंबहूना सर्वांनीच जबाबदारीचे भान ठेवून वागायची ही वेळ आहे. आपल्या चुकीच्या कृतीने पाकिस्तानी मनसुब्यांना खतपाणी घातले तर जात नाही ना? याचा सारासार विचार केला तर हा देश कुणालाच कधी हार जाणार नाही. रात्र वैऱ्याची आहे! भारतीय नागरिका, राजा सावध रहा!
किशोर आपटे.
(लेखक व राजकीय विश्लेषक)