बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही : हुसेन दलवाई

मुंबई : बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भिती माजी खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात बोलताना दलवाई म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात हजारो निष्षापांचा बळी गेला. १५ लाख लोक अयोध्येला जमा झाले होते. ते कोणाच्या नेतृत्वाखाली तिथे आले होते? इतकेच नव्हे तर अनेक जण मशिद तोडण्यासाठी लागणारी औजारेसुद्धा घेऊन गेले होते. याचे पुराव्यासह वृत्तांकन वृत्तपत्रांमधून व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने पाहिले आहे. तरीही या कटात सहभागी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते हे अत्यंत धक्कादायक व अनाकलनीय आहे.

या निर्णयानंतर काही लोकं मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत शुभेच्छा देत आहेत हे पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ठ लोकांना अशाच प्रकारे आनंद व्यक्त करून पेढे वाटले होते याची आठवण येते असे दलवाई म्हणाले.

Social Media