मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजशिष्टाचाराच्या मर्यादा सोडून पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यावर अचानक तुम्ही सेक्युलर झालात का? अशी टिपणी केल्याने मुख्यमंत्र्यानी देखील ठाकरी शैलीत उत्तर दिले आहे. माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले आहे.
करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल असा उल्लेख मुख्यमंत्र्यानी उत्तराच्या पत्रात केला आहे. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?
मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.