मुंबई : बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन काय आहे? याबाबत तपास सुरू आहे.. एनसीबीने तपास केला नाही तर चार ते पाच दिवसात पोलिस तपास सुरू करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. यापूर्वी सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एनसीबीकडे पाठवली होती. मात्र एनसीबी याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल उपस्थित होत होता. सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत, जर एनसीबीने तपास केला नाही तर पोलीस याचा तपास करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
नरेंद्र मोदी सिनेमाचा सहनिर्माता संदीपसिंहचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध यामुळे बॉलिवूड आणि भाजप नेते पुन्हा चर्चेत आले आहेत. तसेच भाजपचे मागील निवडणुकीतील स्टार प्रचारक विवेक ऑबेरॉय यांचे ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्याची सचिन सावंत यांची मागणी केली आहे. विवेक ऑबेरॉय हे नरेंद्र मोदी बायोपिकचे निर्माते आहेत. भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकातील बंगलोर पोलीस मुंबईत येऊन विवेक ऑबेरॉयची चौकशी करतात, मग एनसीबी तपास का करत नाही? असा सवालही यावेळी उपस्थित झाला आहे.
या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीक निर्मात्याचे नाव येत होते. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही. या संदर्भात संदिप सिंह व विवेक ओबेरॉय यांचे नाव येत होते. ड्रग कनेक्शन संदर्भात बंगळूरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही हे आश्चर्याचे आहे. या सदंर्भात काही महत्वाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत राहिले आहेत. बॉलिवूडमध्ये इतके मोठे निर्माते असताना केवळ संदिप सिंह याच्याच कंपनीची निवड बायोपीकसाठी का केली? सदर बायोपीकच्या पोस्टर अनावरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला अमुल्य वेळ काढून गेले होते. सदर संदिप सिंहचा पार्टनर हा अभिनेता विवेक ओबेरॉय आहे. या दोघांनी मोदींचा बायोपीक काढला आहे तसेच मोदींची भूमिकाही विवेकनेच केली आहे.
विवेक ओबेरॉय गुजरातमध्ये भाजपाचे स्टार प्रचारक होते. केवळ या दोघांच्या कंपनीलाच गुजरात सरकारने बोलवून वायब्रंट गुजरातमध्ये १७७ कोटी रुपयांचा करार केला होता. कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचारात सामिल झालेली अभिनेत्री रागिनी व्दिवेदी ही सँडलवूड ड्रग्ज रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तिच्याबरोबर १२ लोकांवर ड्रग पेडलींगचा गुन्हा दाखल केलेला आहे. या १२ लोकांमध्ये आदित्य अल्वा नावाचा व्यक्ती देखील असून तो अद्याप फरार आहे आणि आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे. ही सर्व माहिती चौकशीकरता दिली होती परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
बंगळूरु पोलीसांनी काल १५ऑक्टोबरला अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरी छापे मारले त्याच दिवशी लॉकडाऊन नंतर देशभरात जो पहिला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तो नरेंद्र मोदींचा बायोपीक होता. हा नियतीचा योगायोग आहे. महाराष्ट्र भाजपा कार्यालयात संदिपसिंहने ५३ वेळा कोणाला फोन केला याचे उत्तरही अजून मिळालेले नाही, असेही सावंत म्हणाले.