एस.टी. कर्मचारी मनोज चौधरी आत्महत्या प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करण्याची भाजप आमदाराची मागणी 

मुंबई : एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगाराला कंटाळून एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी यांनी आज दुर्दैवी आत्महत्या केली असून आपल्या मृत्यूला ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. ही अत्यंत हृदय द्रावक घटना असून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारने तोच न्याय मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणात लावावा व मनोज चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून परिवहनमंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजपचे नेते, कांदिवली(पूर्व) चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर व गाड्यांवर करोडो रुपये खर्च करायचा, अनावश्यक विषयांत वकिलांना करोडो रुपये फी द्यायची पण दुसरीकडे कोरोनाचे कारण पुढे करत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रोखून ठेवण्याचे पाप ठाकरे सरकार करत आहे. या विषयी वारंवार करण्यात आलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करून  एसटी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे महापाप ठाकरे सरकार करीत असल्याचा आरोप सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे व्टिट
दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी व्टिट करून म्हटले आहे की, वेतन न मिळाल्याने २ एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या,या अतिशय वेदनादायी,मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही २ कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणाऱ्या  आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?

Social Media