शिक्षकांच्या कोरोना चाचण्या अहवालानंतरच होणार शाळा सुरू; विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांची सहमती आवश्यक 

मुंबई : राज्य शासनाने दि. 23 नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु होणार आहेत, मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी पुर्ण झाल्यानंतरच शाळा सुरु होणार आहेत. त्याचबरोबर पालकांनी लेखी सहमती दिल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांना शाळेच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

कोरोनामुळे प्रथमच सहा महिन्याहून अधिक काळ शाळा व महाविद्यालये बंद ठेवावी लागली. राज्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतची शाळा -महाविद्यालये दि. 23 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करणे शासनाने सक्तीचे केले आहे. दरम्यान सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शिक्षकांची तपासणी या दोन दिवसात पुर्ण होणे अशक्य आहे. शासनाने 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग दि 27 नोव्हेंबर पर्यंत सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र सध्या राज्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या कोरोना तपासणी केंद्राचा विचार करता सात दिवसात राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पुर्ण करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यापुर्वी पालकांकडून लेखी परवानगी शाळा व्यवस्थापन समिती घेणार आहे. लेखी न देणाऱ्या पालकांच्या पाल्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र शाळेत पाठविण्याचा विषय ऐच्छिक असून जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांच्यासाठी आॅनलाईन शिक्षण देण्याची सोय शाळांना करावी लागणार आहे.कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे, त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्याबाबत अनेक पालक संभ्रमात आहेत. त्यात पालकांना लेखी अनुमती द्यावी लागणार असल्याने अनेक पालक लेखी अनुमती देण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता आहे.

 

Social Media