दिल्लीतील आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू असून, कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ रयत संघटना मैदानात उतरली

मुंबई : मुंबई येथे रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करुन महाएल्गार आंदोलन सुरु करण्यात आले.

सदाभाऊ खोत म्हणाले, की दिल्ली-पंजाबमध्ये झालेल्या उद्रेकात शेतकरी अत्यल्प आणि बाजार समित्यांशी संबंधित घटकच जास्त शिरले आहेत. त्यामुळे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्यात शेतकरीहितापेक्षा बाजार समितीतील दलाल व इतर घटकांच्याच हिताचा जास्त विचार केला आहे, ही बाब सामान्यांच्या निदर्शनास आणून दिल्याशिवाय शांत बसणार आहे.

केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून अखेरीस शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. या कायद्यांमुळे शेतमालाच्या विक्रीसाठी जागेचे बंधन नसेल, शेतीविषयक करारांमुळे मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार असेल, बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित राहणार असून, करारांसाठी स्वतंत्र लवाद असणार आहे. या कायद्यांचे सार म्हणजे परकीय क्षेत्रातील गुंतवणूक शेती व्यवस्थेत वाढेल. यातून तंत्रज्ञानाधारित शेतीस चालना मिळून उत्पादकताही वाढीस लागणार आहे, असा दावाही खोत यांनी केला.

शेतकऱ्याला पारंपरिक कमजोर व्यवस्थेच्या जोखडातून कधीही मुक्त करायचे नाही, अशी भूमिका काँग्रेसने सुरुवातीपासून घेतली आहे. काँग्रेसच्या तर जाहीरनाम्यात शेतीहिताच्या असणाऱ्या गोष्टींविषयी प्रत्यक्षात मात्र प्रतारणा दिसते, असे सांगत खोत यांनी काँग्रेसवर संधान साधले.

परकीय गुंतवणूक वाढेल
देशात कृषी वगळता सर्वच क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्याची फळे आपण चाखतो आहोत. कायमच संघर्षात असणाऱ्या शेतीला गती द्यायची असेल, तर त्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक गरजेची आहे. केंद्राचे कृषीविषयक नवीन कायदे ही गती नक्कीच देऊन शेतीत परकीय गुंतवणूक वाढवतील. हे शेतीच्या फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांनी हेही लक्षात घ्यायला हवे, असे माजी मंत्री खोत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील राजकारण जसे साखर कारखान्यांभोवती फिरते तसे पंजाब-हरयाणाकडे हेच राजकारण बाजार समित्यांभोवती फिरते. या समित्यांमधील शेतकरीव्यतिरिक्त घटकांचा आक्रोश हा शेतकऱ्यांचा म्हणून मांडला जात आहे. हे प्रत्यक्षात तसे नाही, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे देखील उपस्थित राहुन पाठींबा दिला. तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, युवा नेते सागर खोत, पक्षप्रवक्ते लालासो पाटील, भानुदास शिंदे, जितू आडीलकर, सुहास पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, उपाध्यक्ष रविंद्र खोत, महिला उपाध्यक्षा नीता ताई खोत, एन. डी. चौगुले सर तसेच महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

tag- sadabhau khot/agriculture bill

Social Media