मुंबई : दिवाळी प्रमाणेच यंदाच्या वर्षाअखेरीस मुंबईत फटाके फोडण्यास बंदी येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर मुंबईतील नाईट क्लब आणि पब्सवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात विशेष पथके तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
यंदाच्या कोरोना काळात दिवाळीत फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खाजगी संकुलांमध्ये बिनआवाजाच्या फुलबाजा , पाऊस अशी रोषणाई करणारे फटाके वाजवण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली होती. नववर्षाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जातात , मात्र यंदाच्या वर्षी दिवाळीप्रमाणेच यावर बंदी येण्याची शक्यता आहे. नववर्षाला फटाके फोडावेत कि नाहीत याचा निर्णय लवकरच परिस्तिथी पाहून घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेने मागील आठवड्यात वांद्रे व परेल येथील नाईट क्लब वर धाडी टाकल्या होत्या. या धाडीत सर्व नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर विनामास्क गर्दी आढळून आली होती. महापालिकेने या नाईट क्लब वर गुन्हा दाखल केला आहे. यानुसार पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सर्व प्रभागांच्या आयुक्तांना नाईटक्लब आणि पब वर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत . तसेच वेळ पडल्यास नियमबाह्य सुरु असलेल्या क्लब आणि पबवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.