मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची आज एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ६ तास चौकशी केली. त्याला बुधवारी १६ डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत त्याने एनसीबीकडे २१ डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती. अर्जुन रामपाल काही कागदपत्रांसह चौकशीसाठी हजर झाला होता. अर्जुनच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसचे रिपोर्ट आल्यानंतर एनसीबीने त्याला दुसऱ्यांदा समन्स बजावले होते. या रिपोर्टमधून काही महत्त्वाचे पुरावे एनसीबीच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आले होते. एनसीबीकडून या प्रकरणी बॉलीवूडचे अनेक कलावंत, निर्माता दिग्दर्शकांची चौकशी करण्यात आली. यात अर्जुन रामपाल याचाही समावेश होता.
यापूर्वी १३ नोव्हेंबर रोजी तब्बल सात तास अर्जुनची चौकशी झाली होती. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या चौकशीदरम्यान अर्जुनने एनसीबीला सहकार्य केल्याचे सांगितले गेले होते. मात्र त्याने दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे म्हटले जाते. म्हणून त्याला दुस-यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापूर्वी ९ नोव्हेंबर रोजी त्याच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. या औषधावर भारतात बंदी आहे. या गोळ्या ड्रग्ज प्रकारात मोडतात. याबाबत अर्जुन रामपाल याला खुलासा करायचा होता. ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी अर्जुनची लिव्ह इन पार्टनर ग्रॅब्रिएला डेमेट्रियड्सची चौकशी झाली होती,तर तिच्या भावाला अमली पदार्थासह एनसीबी ने अटक केली होती.
याशिवाय अर्जुनच्या कार चालकालाही ताब्यात घेण्यात आले होते. एनसीबीने अर्जुनच्या घरातून काही मोबाइल फोन आणि लॅपटॉप जप्त केले होते. दरम्यान, एनसीबीने अभिनेत्याच्या नातेवाईकाचा हवाला देत म्हटले आहे की, अर्जुनने दिल्लीतील डॉक्टरांकडून सीडिटेव ड्रग क्लोजेपामचे बॅकडेट प्रिस्क्रिप्शन बनवून घेतले होते. हे प्रिस्क्रिप्शन रामपालच्या घरातून मिळाले आहे. हे औषध केवळ डॉक्टरांच्या निर्देशानुसार वैद्यकीय दुकानातून घेतले जाऊ शकते. एनसीबीने डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा जबाब घेतला आहे. ६ तास चौकशी झाल्यानंतर अर्जुन रामपाल याला एनसीबीने घरी जाण्याची परवानगी दिली.
tag-Arjun Rampal questioned by NCB for six hours