कोविड-19 लसीकरणासाठी केईएम, शीव, नायर, कूपरसह 8 लसीकरण केंद्रं निश्चित

मुंबई : कोरोनावर लस उपलब्ध होण्याचे संकेत मिळत असून कोरोना विषाणूवरील लसीकरणाची तयारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून वेगाने सुरु झाली आहे. लसीकरणासाठी परळ येथील केईएम, शीव नायर , डॉ. आर. एन. कूपर, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्र सरकारकडून ८ डिसेंबरला झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स्) दिलेल्या सुचनेनुसार आरोग्य सेवक (हेल्थ केअर वर्कर्स) यांचा डेटा बेस कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केला जात आहे. आतापर्यंत सुमारे ८० हजार सेवकांचा डेटा कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. एकूण १ लाख २६ हजार ३७८ सेवकांचा डेटा अपलोड करण्याची ही कार्यवाही वेगाने सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, फ्रंटलाइन अभियंते, वाहन चालक, बेस्ट कर्मचारी, स्मशानभूमी कर्मचारी आणि देखभाल विभागातील कर्मचा-यांकडून आघाडीच्या कामगारांचा डेटा संकलित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. फ्रंटलाईन वर्कर्सचा डेटा एकत्रित करून २५ डिसेंबर पर्यंत कोविन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी नगर विकास विभागाने निर्देशित केलेल्या समन्वय अधिकाऱयांकडे पाठवला जाणार आहे.

कोविड १९ लसीकरणासाठी एस विभागातील कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस स्टोअर (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित करण्यात येत असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. कोल्ड स्टोरेज सुविधा तयार करताना भारत सरकारच्या मानांकनानुसार कामगिरी, गुणवत्ता, सुरक्षितता आदींचे निकष समितीकडून वेळोवेळी पाळले जाऊन त्यानुसार परीक्षण केले जाणार आहे.

३१ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार, कोल्ड स्टोरेजसाठी आवश्यक तांत्रिक समितीची स्थापना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. या समितीमध्ये नॅशनल कोल्ड चेन रिसर्च सेंटरमधील तांत्रिक तज्ज्ञ तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील इतर तज्ज्ञ आणि यांत्रिकी व विद्युत विभागातील प्रतिनिधी कार्यरत आहेत.

भारत सरकार आणि PQS Catalogue यांच्या तांत्रिक वैशिष्टय़ानुसार योग्य क्षमतेची दोन वॉक-इन-कूलर (Walk in Cooler) संच उपकरणे आणि एक वॉक-इन-फ्रिजर (Walk in Freezer) संच उपकरणे खरेदी करण्यात येणार आहे.

एस विभागाचे सहाय्यक अभियंता (देखभाल) यांच्यामार्फत २ आरोग्य केंद्र आणि जिल्हा क्षयरोग विभाग यांचे स्थलांतर व स्थापित करण्याचे कामकाज केले जाणार आहे. राज्य सरकारमार्फत २२५ लीटर क्षमतेचे १७ आयएलआर (आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर) चा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यापैकी ८ आयएलआर नियोजित लसीकरण केंद्रांना (४ वैदयकीय महाविदयालय व ४ उपनगरीय रुग्णालय) देण्यात आले आहेत.

लसीकरणाची यादी अधिष्ठाता करणार
संबंधीत रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक हे मध्यवर्ती लससाठा शीतगृहातून कोविड – १९ लस उपलब्ध झाल्यानंतर या लसीची लसीकरण यादी तयार करण्यासाठी संबधित कर्मचारी (औषध निर्माता / शीतसाखळी हाताळणी कर्मचारी) यांची निवड करतील.

कूपर रुग्णालय आदर्श लसीकरण केंद्र
लसीकरणासाठी विलेपार्लेतील डॉ. कूपर रुग्णालयात एक आदर्श लसीकरण केंद्र विकसित केले जात आहे, जेणेकरून इतर केंद्रांमध्ये त्याची प्रतिकृती तयार केली जाऊ शकेल. तसेच फ्रंटलाइन कामगारांसाठी दुस-या टप्प्यातील लस उपलब्धतेनुसार अतिरिक्त केंद्रे सुरू केली जातील, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

लस वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त!
मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा कोविड -१९ या लस वितरणासाठी वापरण्यात येईल. तसेच मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त अंतर्गत अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत.

लसीकरणानंतर प्रतिकूल घटना उद्भवल्यास, सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, अशा घटनांच्या व्यवस्थापनासाठी उपनगरीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये येथे पुरेशी सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा मजबूत करण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट, नेफरोलॉजिस्ट, श्वसन चिकित्सा विशेषज्ञ यांचा समावेश करण्यासाठी विद्यमान समितीचा विस्तार केला जाईल.

 

tag–8 vaccination centers/ including KEM/ Siva/ Nair/Cooper fixed /for Covid-19 vaccination

Social Media