औरंगाबादचे नाही तर पुण्याचे संभाजीनगर करा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेत ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी ऐतिहासिक घटनांचा संदर्भ जोडला आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजप आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेची जुंपली आहे तर महाविकास आघाडीचा घटक काँग्रेसने देखील याला विरोध केला आहे. त्यामुळे नामकरणाचे राजकारण होत असतानाच त्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नव्या वादाची फोडणी घातली आहे! त्यांनी पुणे जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी सांगितले की, “पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नाव का बदलले नाही? हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलांच्या काळात औरंगाबाद शहर राजधानी होते.

औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक राहायला हवे.” ते म्हणाले की, संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच स्मरण राहावे, यासाठी योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचे नाव दिले तर अधिक उचित होईल,”

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपाने औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा पुढे आणला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे हा अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी यावर आक्षेप घेतला आहे.

Tag- Sambhajinagar/Pune/Aurangabad/Prakash Ambedkar

Social Media