अनधिकृत बांधकामप्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसांत तक्रार 

मुंबई : अनधिकृत बांधकामप्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना आमनेसामने उभी ठाकली आहे. सोनू सूद शिवसेनेला खटकत असल्यानेच त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे हा गुन्हा दाखल झाल्याने सोनू पुढे काय करणार? याबाबतची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी या प्रकरणात उडी घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. केवळ सूड भावनेतूनच सोनूविरोधात कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात जनतेला मदत करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं होतं. त्यावेळी जे सरकारने करायला हवं ते काम सोनूने केलं होतं. सोनूने लोकांना प्रत्यक्ष भेटून मदत केली. त्यामुळे शिवसेनाचा जळफळाट झाला होता. त्यामुळेच सोनूवर कारवाई करण्यात आल्याचा दावा राम कदम यांनी केला होता.

आधी कंगनावर कारवाई केली. आता सोनू सूजवर कारवाई करण्यात येत आहे. हे ठाकरे सरकार आहे की सुडाचे सरकार? कंगनाच्या कार्यालयावर जेसीबी पाठवला. आता सोनूचा नंबर? गरीब मजुरांना स्वत:च्या पैशाने गावी पाठवण्याचं काम सरकारचं होतं. ते सोनूने केलं. त्याचा दोष काय? इतका दोष येतो कुठून? असा सवाल त्यांनी केला.

तसेच कोरोना संकट काळात सोनूचं हॉटेल क्वॉरंटाईन सेंटर म्हणून चाललं. त्यावेळी हे हॉटेल अनधिकृत नव्हतं. आता अचानक हे हॉटेल अनधिकृत कसं झालं? आपण अनधिकृत हॉटेलात क्वॉरंटाईन सेंटर तर तयार करत नाही ना? याची पडताळणी पालिका अधिकाऱ्यांनी का केली नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेने  दिलेल्या तक्रारीत म्हटलं, “सोनू सूद यांनी स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केलं. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.”

इतकंच नाही तर बीएमसीने सोनू सूदवर नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे. सिविक अथॉरिटीने सांगितलं, नोटीस दिल्यावरही ते अनधिकृत निर्माण करत राहिले. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा केला आहे. अधिकाऱ्यांच्यामते, बीएमसीने जारी केलेल्या नोटीसविरोधात सोनू सूदने मुंबईच्या सिव्हिल न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, त्यांना अंतरिम दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने सोनू सूदला उच्च न्यायालायत याचिका करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला होता. बीएमसीच्या मते न्यायालयाने दिलेला तीन आठवड्यांचा कालावधी संपला आहे.

Tag-Mumbai Municipal Corporation lodges a complaint against actor Sonu Sood in an unauthorized construction case

Social Media