मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांना रोख रक्कम स्वरूपात वेतन दिले जात आहे. त्यामुळे नोटांची बंडल, नाणी नेताना बेस्ट कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पगार जमा करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार होऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार पाठवण्याची सोय करून त्यांना अधिकच्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी भारतीय जनता पक्ष बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार रोखीने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक प्रशासनाने काढले असून ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन ११ हजाराच्या वर आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना वेतन रोख स्वरूपात देण्यात येत आहे. तर उर्वरित पगार बँकेच्या खात्यात जमा करण्यात येतो. बेस्टचे किमान तिकीट पाच रुपये असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बेस्टकडे एक, पाच व दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात जमा होतात. यापूर्वी बेस्टकडे जमा होणारी रक्कम आयसीआयसीआय बँकेकडून हाताळली जात होती. बँकेशी असलेला करार संपुष्टात आल्यामुळे बेस्टकडे दररोज जमा होणारी रक्कम रोखीने कर्मचार्यांना दिली जाते. त्यामुळे अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत होत आहे. नाणी आणि कमी किंमतीच्या नोटा नेताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.
तसेच गर्दीतून रक्कम नेणे धोकादायक बनत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाशी रक्कम हाताळणेबाबत केलेल्या कराराची तातडीने अंमलबजावणी करून कोविडच्या सद्यस्थितीत दिवस-रात्र राबणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.
Tag-The salaries of the best employees should be deposited in the bank online