महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार : विधानसभा अध्यक्ष आणि पर्यटन मंत्री यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्याच्या पर्यटनवृध्दीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला.

यासंदर्भात विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष , सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप सचिव राजेंद्र जवंजाड, विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव विलास आठवले, मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. याविधानमंडळातून अनेक दिग्गजांनी सेवेची कारकिर्द गाजविली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमंत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल. तसेच ही वास्तू राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनाही आकर्षाचे केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रारंभी मुंबई विधानमंडळात ही सुविधा सूरू करून कालांतराने नागपूर, पुणे येथील विधानमंडळ वास्तूही जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्याचे निर्देश पटोले यांनी दिले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे त्यातून पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. या सदर्भात पर्यटन विभागाकडून सकारात्मकदृष्टया सहकार्य केले जाईल. तसेच पर्यटन विभाग, विधानमंडळ सचिवालय आणि गृह विभागामार्फत संयुक्तपणे नियमावली तयार करण्यात येईल. स्वागत कक्ष, पर्यटकांची स्क्रीनिंग, ऑनलाईन बुकींग अशा विविध सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश ठाकरे यांनी दिले.

Tag-The Maharashtra Legislature will be open to the public/Assembly Speaker and Tourism Minister

Social Media