काँग्रेसमध्ये तरुण पिढीला नेतृत्व करण्यास मोठा वाव!: बाळासाहेब थोरात
.मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेते अकलूजचे डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कठीण परिस्थिती माणसांच्या जीवनात येते तशीच राजकीय पक्षांसमोरही येते, काँग्रेससमोरही अडचणीचा काळ आहे पण त्यातून पुन्हा पक्ष उभा राहत आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. पक्षात तरुण पिढी निर्माण करण्याची गरज असून तरुण पिढीला काँग्रेस पक्षात काम करण्यास भरपूर वाव आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
टिळक भवनमध्ये डॉ. धवलसिंह मोहित पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला, यावेळी बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खा. हुसेन दलवाई, प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, आ. धीरज देशमुख, सरचिटणीस मोहन जोशी, रामकिशन ओझा, प्रकाश सोनावणे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव झिशान सय्यद, राजाराम देशमुख, अमित कारंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की, डॉ. धवलसिंह हे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असून धाडसाबरोबर त्यांच्यात विनयशिलताही आहे. अकलूज आणि परिसरात ते मोठे सामाजिक काम करत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होणार आहे. काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत असून सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल यासाठी उद्यापासूनच कामाला लागा असे थोरात म्हणाले.
जेष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्ष पराभवाला घाबरणारा पक्ष नसून एकदा, दोनदा नाहीतर तीनदा काँग्रेस पक्षाचा पराभव झाला परंतु पुन्हा नव्या ताकदीने पक्ष उभा राहिला आहे. काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जाणारी तरुण पिढी प्रत्येक राज्यात आहे. धवलसिंह हे सामाजिक कार्यात धडपडणारे असून नेतृत्व, कर्तृत्वाबरोबर दूरदृष्टी असणारे तरुण नेते आहेत. काँग्रेसमध्ये येण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे. त्यांच्याबरोबर आता काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले असून मोठे सैन्य अजून येणार आहे.
धवलसिंह हे धाडसी नेते असून नुकतेच त्यांनी चार जिल्ह्यात लोकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या बिबट्याला आपल्या जीवाची पर्वा न करता टिपले आहे. हा बिबट्या लोकांना त्रास देत होता त्याचे काम त्यांनी केले असून आता सोलापूर जिल्ह्यात त्यांना भाजपासोबत असेच दोन हात करावे लागणार आहेत, असे आ. धिरज देशमुख म्हणाले.