मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी अत्यावश्यक व आधुनिक स्वरुपाच्या सोईसुविधा नाहीत. वांद्रे ते पार्ला दरम्यान मुंबई महानगरपालिकेचे दुसरे रुग्णालयही नाही त्यामुळे या परिसरात होणाऱ्या अपघातामधील रुग्णांना कुपर रुग्णालयात दाखल करावे लागते. यामुळे कूपर रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडतो, ही बाब लक्षात घेऊन हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातच अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिकेने ५० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा प्रवक्ते राजेश शर्मा यांनी केली आहे.
राजेश शर्मा यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी ५००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील एक टक्का म्हणजे ५० कोटी रुपये हे जोगेश्वरी येथील या रुग्णालयासाठी राखीव ठेवून याच रुग्णालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास या भागातील लोकांनाही मोठी मदत होईल.