काँग्रेसच्या सोशल मीडिया मोहिमेचे नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपाच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन लाख गांधीदूत भाजपाच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या सोशल मीडिया मोहिमेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पंधी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. वजाहत मिर्झा, आ. विक्रम सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रकाश सोनावणे, डॉ. राजू वाघमारे, डॉ. संजय लाखे पाटील, सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजेश चटवाल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, स्व. राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्यावेळी हेच भाजपावाले त्याला तीव्र विरोध करत होते, मात्र त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजपा आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे परंतु त्यांना आता काँग्रेसकडूनही चोख उत्तर मिळेल. भाजपाकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल व सत्य माहिती जनेतसमोर आणेल. भाजपाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने अपप्रचार केला जातो. भाजपा ही खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपाला काँग्रेसकडून उत्तर मिळेल.
ऑगस्ट क्रांती मैदानावर उद्या नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा
महाराष्ट्र सोशल मीडियाचे अभिजित सपकाळ म्हणाले की, भाजपाकडून सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला जातो.देशात आज १६ ते ३५ वयोगटातील तरुणवर्गाची लोकसंख्या ६२ टक्के आहे. सोशल मीडियाचे महत्व ओळखून देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, शेतकरी वाचवण्यासाठी या मोहिमेत तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गौरव पंधी म्हणाले की, सोशल मीडियावर काँग्रेस मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. कोरोना काळात हेच माध्यम संपर्काचे मुख्य साधन राहिले. देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत तसेच डीजीटल माध्यवरही काँग्रेसचे कार्यकर्ते आता गावपातळीपर्यंत सक्रीय आहेत. हे कार्यकर्ते, समर्थक यांना एका छताखाली आणण्यासाठी ही मोहिम राबिवली जात आहे. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी ही मोहिम आखण्यात आली असून हे एक आंदोलनच आहे. एका महिन्यात महाराष्ट्रातून दोन लाख लोकांना या मोहिमेत जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
तत्पूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर दादर येथील जैन मंदिराला भेट दिली. नंतर चैत्यभूमीवर जाऊन महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तसेच माहीम दर्गा येथे जाऊन चादर अर्पण केली व माहीम चर्चला भेट दिली. त्यानंतर पटाले गुरु तेग बहादूर नगर येथील दशमिरा दरबार गुरुद्वारा येथे जाऊन अभिवादन केले.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण कार्यक्रम उद्या १२ तारखेला ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे. मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यास नाना पटोले पुष्पहार अर्पण करून विधानभवन येथील महापुरुषांना तसेच दक्षिण मुंबईतील महापुरुषांना ते अभिवादन करतील. हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. त्यानंतर मंत्रालयापासून ट्रॅक्टरने गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास करतील तेथे लोकमान्य टिळक पुतळ्यास तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तेथून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत बैलगाडीने प्रवास करतील. पदग्रहण सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम ऑगस्ट क्रांती मैदान येथे होत आहे.