उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चमकोगिरी न करता शिक्षणाच्या प्रश्नांवर लक्ष द्यावे : भाजप आमदार अतुल भातखळकर

मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चमकोगिरी न करता शिक्षणाच्या प्रश्नांवर लक्ष द्यावे अशी टिका भाजप आमदार आणि मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखळकर यांनी केली आहे. प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात भातखळकर यानी मंत्रालय@वरळी या   सामंत यांच्या  जनता दरबाराचा आर्थिक भार कोरोनामुळे आर्थिक तंगीत असलेल्या विद्यापीठांवर टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे.

युवराजांना खूश करण्यासाठी

भातखळकर यांनी म्हटले आहे की सामंत यांनी शिवसेनेच्या युवराजांना खूश करण्यासाठी वरळीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी आधीच अपूरा असलेल्या निधीमुळे अडचणीत असलेल्या विद्यापीठावर या कार्यक्रमाचा बोजा टाकण्यात आला आहे असे ते म्हणाले. भातखळकर यांनी आरोप केला आहे की, मंत्री सामंत यांच्या विशेष कार्य अधिकारी यांनी विद्यापीठाना पत्र पाठवून विद्यापीठातील कंत्राटे आणि आर्थिक बाबीत रस दाखवला होता.

नियामक मंडळाची परवानगी नाही

धक्कादायक बाब अशी की विद्यापीठांच्या आर्थिक व्यवस्थेतून हा कार्यक्रम करताना विद्यापीट नियामक मंडळाची किंवा कुलपती असलेल्या राज्यपालांच्या कार्यालयाची देखील परवानगी घेण्यात आली नाही. कार्यक्रमाचे कंत्राट कुणाला द्यायचे ते आधीच ठरवून केवळ कंत्राटाचे पैसे लाटण्यासाठी जनता दरबाराचा घाट घातल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी सामंत यांनी युवराजांच्या बाल हट्टासाठी  आणि स्वत:च्या प्रसिध्दीच्या हव्यासासाठी घेतलेला कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी त्यानी केली आहे.

Social Media