मुंबई : शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची ठेवीतील रक्कम दुप्पट म्हणजे किमान ५० कोटी रूपये करण्यात यावी आणि त्यातून येणार्या वाढीव व्याजातून सर्व पात्र ज्येष्ठ पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
जाचक अटी शिथील करा
सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथील कराव्यात आणि कल्याण निधीचे विश्वस्त मंडळ लगेच नियुक्त करण्यात यावे असा आग्रह देखील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात धरला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या या पत्रात म्हटले आहे की,बँकेच्या व्याज दरात घसरण झाल्याने कल्याण निधीच्या मुदती ठेवीवरील व्याजातून मिळणार्या रक्कमेत मोठी घट झाली आहे.त्यामुळे सन्मान योजना असेल किंवा आरोग्य योजनेचा लाभ देताना हात आखडला जात आहे.निधी कमतरतेचे कारण सांगून अधिकारी अनेक पात्र ज्येष्ठ पत्रकारांचे अर्ज नाकारत आहेत.त्यामुळे सरकारच्या या योजनेचा लाभ वयोवृध्द पत्रकारांना मिळतच नाही..एका बाजुला पात्र व्यक्तींना सन्मान मिळत नाही आणि दुसरीकडे अनेक अपात्र व्यक्तींना पेन्शन योजनेचा लाभ मिळताना दिसत आहे हे सांतपजनक असून जे पात्र नाहीत त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी पत्रात केली आहे.
तर पत्रकार आंदोलन करतील
पत्रकार कल्याण निधीत सरकारने २५ कोटी रूपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले आहेत ती रक्कम किमान ५० कोटी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या अधिवेशनात सरकारने यासंबंधीचा निर्णय घेतला नाही तर राज्यातील पत्रकार मोठे आंदोलन करतील असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.पेन्शन योजनेच्या जाचक अटीमुळे अनेक पत्रकार योजनेपासून वंचित राहिले आहेत.
सन्मान योजना की अवमान योजना
त्यामुळे योजनेचा लाभ देताना वयाची मर्यादा ५८ वर्षे करावी तसेच अनुभवाचा कालावधी २५ वर्षांचा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.राज्यातील काही पत्रकारांकडे ३० वर्षे अधिस्वीकृती असताना देखील तुम्ही पात्र नसल्याचे सांगून त्यांना सन्मान नाकारला जात आहे. ३० वर्षांपुर्वीची नियुक्तीपत्रे मागून पत्रकारांना त्रास दिला जात आहे.. पत्रकारांना चकरा मारायला लावून त्यांना अवमानीत केले जात असल्याने ही सन्मान योजना आहे की अवमान योजना असा प्रश्न पडतो आहे.या विरोधात धुळे आणि जळगावच्या वयोवृद्ध पत्रकारांनी नुकतेच उपोषण केले होते याकडे देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
शंकरराव चव्हाण कल्याण निधीसह पत्रकारांच्या सर्वच समित्यांची मुदत संपून तीन-तीन वर्षे झाली असली तरी या समित्या स्थापन केल्या जात नाहीत.त्यामुळे काही अधिका-यांची मनमानी सुरू आहे. अधिस्वीकृतीचे अर्ज मंजूर करताना देखील मोठ्या प्रमाणात पक्षपात होत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.पत्रावर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी आदिंच्या स्वाक्षरी आहेत.