मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जावून काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बुथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केले.
यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न
यवतमाळ व चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे आज पार पडली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, आ. वजाहत मिर्झा, आ. प्रतिभा धानोरकर, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते..
या बैठकीला मार्गदर्शन करताना पटोले म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक कल्याणकारी योजना राबिवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबिवली. अवकाळीचे नुकसान होताच १० हजार कोटी रुपयांची मदत दिली. मागील भाजपा सरकारपेक्षा जास्त मदत अवघ्या एका वर्षात केली आहे. सरकारने केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती गावा-गावात पोहोचवण्याचे काम करा.
काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी कट्टीबद्ध असलेला पक्ष आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. देशभरातून नरेंद्र मोदीची हवा आता संपली असून काँग्रेसला अनुकुल वातावरण आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपाचा बालेकिल्लाही विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला आहे. पुण्याची जागाही काँग्रेसने जिंकली. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले आहे. लोकांचा हा विश्वास कायम ठेवून जोमाने काम केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अधिक सोपा होईल, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.