मुंबई : भारत का अमृत महोत्सव उपक्रमाचे आयोजन भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात उद्या शुक्रवार १९ मार्च २०२१ रोजी करण्यात येणार आहे. या कारणाने सुरक्षेचा उपाय म्ह्णून दुपारी १ वाजेपासून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांना बंद करण्यात येणार आहे.
उद्या शुक्रवार, १९ मार्च २०२१ रोजी दुपारी १ वाजेनंतर वीरमाता जिजामाता उद्यान बंद
१५ ऑगस्ट २०२२ रोजी साजऱ्या होणाऱ्या भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारत का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत, देशभरातील एकूण ७५ प्राणिसंग्रहालयांमध्ये ७५ आठवड्यांच्या कालावधी दरम्यान विविध ७५ प्रजातींच्या प्राणीपक्ष्यांच्या संवर्धन जागृतीकरिता निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात करण्याचा बहुमान महापालिकेच्या भायखळा (पूर्व) स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयास मिळाला आहे.
शुक्रवार, १९ मार्च २०२१ रोजी दुपारी ४ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्रेक्षागृहामध्ये साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (नवी दिल्ली) चे अधिकारी, महानगरपालिकेतील पदाधिकारी तसेच सिनेक्षेत्रातील कलावंत यांची उपस्थिती असणार आहे.
या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने आणि गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणून शुक्रवार,१९ मार्च २०२१ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय दुपारी १ वाजता नागरिकांना बंद करण्यात येणार आहे.