मुंबई : देशभरात हायवेवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल घेतला जातो. मात्र, आता याच टोलवरून केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये देशभरात फास्टटॅगची पूर्ण अंमलबजावणी केली जाईल आणि एका वर्षात टोल घेण्याची व्यवस्था रद्द करण्यात येईल, अशी घोषणाच गडकरी यांनी केली आहे.
लोकसभेत नितीन गडकरी यांना बहुजन समाज पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली यांनी गढमुक्तेश्वरजवळील रस्त्यावर नगरपालिका हद्दीत टोल प्लाझाचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर गडकरी म्हणाले, ‘मागील सरकारमध्ये रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटांमध्ये आणखी ‘मलाई’ टाकण्यासाठी शहराच्या सीमेवर असे अनेक टोल प्लाझा बांधले गेले आहेत. हे निश्चितच चुकीचे आणि अन्यायकारक आहे’ तसेच आता हे सर्व टोलनाके हटवण्यात आले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या नुकसानभरपाई मागतील. मात्र, सरकारने एका वर्षात सगळे टोल संपुष्टात आणण्याची योजना बनवली आहे.
गडकरी पुढे म्हणाले, सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामध्ये जेवढं हायवेवरून जाल तेथूनच तुमच्या वाहनाचा GPS च्या माध्यमातून फोटो काढण्यात येईल आणि तुम्ही जेव्हा हायवेवरून उतराल तेव्हाही फोटो काढेल. त्यानुसार, तुमच्या अंतरानुसार टोल भरावा लागणार आहे.