मुंबई : महापालिकेच्या (BMC)काही रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा कालपासून तुटवडा जाणवत असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी आज संबंधित महानगरपालिका रुग्णालयांना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली.
महापौर किशोरी पेडणेकर व आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी महापालिकेच्या वांद्रे भाभा, कुर्ला भाभा सर्वसाधारण रुग्णालयाला तसेच गोवंडीच्या पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय व बोरिवलीच्या भगवती रुग्णालयाला भेट देऊन प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप जाधव यांच्यासोबत चर्चा केली.
ऑक्सीजनचा तुटवडा(Oxygen shortage)
यावेळी महापौर म्हणाल्या की, संबंधित रुग्णालयात ऑक्सीजन सिलेंडर व डयूँरा ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा झाला नसल्यामुळे कालपासून ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे येथील रुग्णालयांच्या आयसीयू विभागातील रुग्णांना तसेच ऑक्सिजन लावलेल्या संबंधित रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये(Jumbo Covid Centre) दाखल करण्यात आले आहे. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संबंधित पुरवठादारांसोबत चर्चा केली असता, त्यांनी कच्च्या मालाचा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे सांगितले. याबाबत तोडगा काढण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून अशा आपत्कालीन स्थितीत हँडी ऑक्सिजनचा वापर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. संबंधित हँडी ऑक्सिजन हे चार तासापर्यंत चालत असल्याने आपत्कालीन स्थितीत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी हे उपयुक्त असल्याचे महापौरांनी सांगितले.
या बाबींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लिक्विड स्वरूपातील ऑक्सीजन प्लांँट बसविण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी महापालिका प्रशासनाला दिले. तसेच गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात व भगवती रुग्णालयात ऑक्सिजन कॅप्सूल प्लाँट सुरू करण्याबाबतची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. मुंबईकर नागरिकांना आम्ही सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नरत असून नागरिकांनी घराबाहेर न पडता महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.
याप्रसंगी नगरसेवक प्रकाश पाटणकर, नगरसेविका समृद्धी काते, कुर्ला भाभा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षका डॉ. उषा शर्मा, पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.अलका माने उपस्थित होत्या.
Mumbai mayor Kishori Pednekar today visited the concerned municipal hospitals to know the facts as some BMC hospitals have been facing shortage of oxygen given to covid patients since yesterday.