चंदीगड : भारताचे महान धावपटू flying sikh मिल्खा सिंग यांचे काल रात्री वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले . पाच दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता.
या दोघां पती- पत्नीच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात आणि देशात शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद , उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.
गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केलं होतं. अखेर मिल्खा सिंग यांची प्राणजोत काल रात्री मावळली.