मुंबई : राजकीय अभिनिवेशनातून केंद्र सरकारवर किंबहुना भाजपवर आरोप केल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार काहीच करू शकत नाही. ईडी तपास यंत्रणा भारतीय जनता पार्टीने स्थापित केल्या का ? कॉँग्रेसच्या काळात ईडी यंत्रणा आली असून या यंत्रणेचा गैरवापर कॉँग्रेसकडून कशाप्रकारे झाला हे देशवासियांना माहीत आहे, त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून अशा प्रकारची भूमिका राज्य सरकार घेत असून हे उचित नसल्याचे मत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.
आज माध्यमांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले, भाजप ईडीचा दुरुपयोग करत आहे, या आरोपात काही तथ्य नाही. विरोधकांकडून तक्रारी होत असतात, आरोप केले जातात परंतु कायद्याच्या चौकटीत चौकशी होत असून सत्य समोर येईल असा दावा दरेकर यांनी यावेळी केला.
तीन चाकी आघाडी सरकारमधील नेत्यांची कुरघोडी
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सरकारमध्ये व पक्षात सर्व आलबेल असल्याचं वक्तव्य केलं, त्यावर दरेकर म्हणाले, पक्षांतर्गत सर्व काही आलबेल असतं तर तीन चाकी आघाडी सरकार मधील नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य आली नसती. महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षांतर्गत कुरघोडी होत आहेत. महसूल मंत्री पद मिळण्याची आवश्यकता होती, पण ओबीसी असल्याने संधी मिळाली नाही अशा शब्दात मंत्री विजय वडेटटि्वार यांनी नाराजी व्यक्त केली, त्यावर कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टिवार यांच वय पाहता त्यांना भविष्यात खूप मोठी संधी मिळेल असल्याचे सांगितले. त्यामुळे एकमेकांना सल्ले देणं, चर्चा करणे हे त्यांनी आपापसात चार भिंती मध्ये बसून ठरवावे, परंतु एकमेकांवर कुरघोडी करण्यात मविआ व्यस्त आहे. तरीही पक्षांतर्गत आलबेल असल्याचा दावा खासदार संजय राऊत करत असतील तर महाविकास आघाडी सरकारमध्ये काय चाललं आहे हे समजून येत आहे.असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी
केंद्राने ६ लाख २८ हजार कोटीचं पॅकेज जाहीर करत उद्योगजगताला दिलासा देण्याचं काम केलं आहे. वेगवेगळ्या व्यवसायांसाठी, छोट्या उद्योगजतासाठी हे पॅकेज निश्चितपणे दिलासा देईल. पर्यटन उद्योगासाठी १० लाख विनातारण कर्ज दिलं. कोरोंना संकट काळात अनेक छोटे पर्यटन उद्योग अडचणीत सापडले आहेत, छोटे उद्योगांना २ टक्के व्याजदार आणि सव्वा लाख कर्ज केंद्र सरकार देणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने आणखी भरीव मदत देऊन छोटे मोठे उद्योगधंदे सुरळीत करण्याची आवश्यकता आहे आणि ते राज्य सरकारने करण्याची मागणी दरेकर यांनी केली.
सत्ता टिकवण्यासाठी केवळ एकत्रित
क्रॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या भूमिका सकाळ, दुपार, संध्याकाळ बदलत असतात. कधी स्वबळाचा नारा देणार असे वक्तव्य करतात तर त्यांच्याच पक्षाचे नेते विरोधी भूमिका घेऊन स्वबळावर लढणार नसल्याची भूमिका घेतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, आहे बळ हातात असायला पाहिजे तेव्हाच स्वबळाची घोषणा करू. प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवायचा, नारे देण्याचा अधिकार आहे. सत्ताधारी पक्षातून विरोधी भूमिका आल्या तरी महाविकास आघाडी सरकारला माहीत आहे की आपल्याला एकत्रित सत्ता चालवायची आहे किंबहुना भाजपचा अश्वमेध रोखायचा असेल तर आपल्यामधील सगळ्या गोष्टींना मूठमाती देत एकत्रित लढावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत महापौरांना न बोलावणे हे राजकारण नाही, तर काय ?
संकटाच्या काळात सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे असं आपण बोलतो आणि दुसऱ्या बाजूला पुणे महापालिकेच्या महापौरांना उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केलेल्या बैठकीसाठी न बोलावणे हे राजकारण नाही तर काय ? कोणत्याही पक्षाचे महापौर असो किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था असा वादविवाद न करता संकट काळात सर्व समावेश बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
Ed investigation agency misused by Congress