मुंबई, दि. ३१ : मंदिराचे भूमिपूजन होत असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. राम मंदिराचे भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हचे, पण ही योग्य वेळ नाही, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात त्यांनी मंदिराचे ई-भूमिपूजन मान्य नसल्याचेही म्हटले आहे.
येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. सर्वधर्मीय लोक यावेळी उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तयार केलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही. याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “राम मंदिर निश्चित झाले पाहिजे ही माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. त्यासाठी असंख्य कारसेवकांनी प्राणांची आहुती दिली. अभिमानास्पद गोष्ट आहे.
पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. लोक वेगळ्या विवंचनेत आहेत. भूमिपूजन आहे, एक दिवसाची बातमी होती. पण लोक त्या मानसिकतेत नाही. झाले तर आनंद आहेच, ते मंदिर उभे राहिल तेव्हा जास्त आनंद होईल. पण आताच्या वेळी हे भूमिपूजन का ठेवले हा प्रश्न आहे. दोन महिन्यांनी झाले तरी चालेल. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर स्थिरस्थावर झाल्यावर या लोकांच्या आनंदात सारे सहभागी होतील. त्यामुळे ई-भूमिपूजन नको, त्याचे जल्लोषात भूमिपूजन हवे.” असे ठाकरे म्हणाले.