‘गुरु’ माझा कल्पतरू…

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः, पूजामूलं गुरोः पदम् । मंत्रमूलं गुरोर्वाक्यं, मोक्षमूलं गुरोः कृपा ॥७६॥
ध्यानाचे आधारस्थान गुरुमूर्ती होय. पूजेचे मूलस्थान गुरुचरण, मंत्राचे उगमस्थान गुरुवाक्य, मोक्षाचा मूलाधार गुरूची कृपा होय.

आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा (Guru Purnima)म्हणून गौरवितो. या दिवशी चंद्र पूर्ण कलेने युक्त असतो. “व्यासो नारायण स्वयं”! गुरु पौर्णिमेला व्यास पोर्णिमा (Vyas Pornima)असे सुद्धा म्हणतात. व्यास म्हणजे ज्ञानाचा सागर.

ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिलीत, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जातात.
खरे तर आपल्या जीवनाचा आधार हा अध्यात्मच आहे. अशावेळी अध्यात्म साधनेची वाटचाल करणार्याप साधकांचा “गुरुपौर्णिमा “ हा पर्वणीचा दिवस. संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबांच्या भाषेत, शुद्धस्वरूपी त्रिगुणातीत, आत्मरूप, उदार, कृपेचा अखंड वर्षाव करणार्याट’ सद्गुरुंचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. श्री गुरूंना शरण जाणे म्हणजे गुरुमय होणे. अशा शरणागतीतून सर्व लघुतत्त्व संपुष्टात येते. जे गुरु आहेत त्यांचा स्वीकार व श्री गुरू यांच्या गुरुतत्त्वांचा पुरस्कार हे गुरुपौर्णिमेचे वैशिष्टय़ होय.

अंध:कारातून प्रकाशाचा मार्ग दाखविणारे म्हणजे गुरु. गुरुंचं महत्व प्रत्येकाच्या जीवनात अनन्य साधारण असं आहे. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे. गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात. म्हणूनच अत्यंत श्रद्धापूर्वक आपण अनादी काळापासून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करीत असतो. पुराणात सुद्धा गुरूंना ईश्वरांहून श्रेष्ठत्व दिलं आहे. गुरु हे शिष्यांचे, भक्तांचे, उपासकांचे प्रतीपालन करतात. आपण सिद्ध केलेल्या उपासनेतून, शुद्ध, प्रयोगशील अध्यात्माची शिकवण ते देतात. उपासने द्वारे सज्जनांचे संरक्षण, दुष्प्रवृत्तींचा नाश, करून सर्वांच्या वृत्तीत, नकळत बदल घडवून आणतात.
भारतानेच जगाला गुरूपरंपरेची देणगी दिली आहे असे म्हटलं तर, वावगं ठरणार नाही. पुरातन काळापासून गुरुशिष्य परंपरा आपल्या भारत देशात प्रचलित आहे. म्हणूनच, भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय.

मानव प्राणी आपल्या मातेच्या उदरात असतांना पासून त्याचेवर सुसंस्कार व्हावेत, असं प्रत्येक आईवडिलांना वाटते आणि त्याचे वर गर्भसंस्कार आपसूकच होतात. आपल्यावर निरनिराळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरु! राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी समाजाला जागृत करणे, हाही गुरूंचा धर्म आहे. निखळ सत्याची जाणीव करून देणारा तो गुरू. म्हणूनच गुरू हा ज्ञानसूर्य असतो. त्याच्या प्रज्ञेचे, प्रतिभेचे तेजस्वी किरण या अज्ञानरुपी अंध:काराचा नाश करतात. शिष्याला ‘स्वत्वाची’ जाणीव करून देतात.

वेदधर्म-संदीपक’, गुरु द्रोणाचार्यां-एकलव्य, गुरु द्रोणाचार्य-अर्जुन!, समर्थ रामदासस्वामी-शिष्य कल्याण,

त्याचप्रमाणे चांगदेवाचे गुरू नामदेव, नामदेवांचे गुरू ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथ, अशी गुरू-शिष्य परंपरा आपल्याला दिसून येते. गुरूच एक देव होय. गुरूच एक धर्म होय. गुरुहून श्रेष्ठ काही नाही. गुरूपुढे महान कुठलेही तत्व नाही. गुरू या शब्दाचा अर्थच महान, मोठा असा आहे. गुरूंची महती सांगतांना संत कबीर म्हणतात, “गुरु गोविंद दोऊ खडे काकै लागौ पाय। बलिहारी गुरु आपने गोविंद दीजो बताय।।” इथे त्यांनी देवाच्याही आधी गुरूच्या पायावर डोके ठेवणे पसंत केले आहे. “परीस हा लोखंडाला स्पर्श करून त्याचे फक्त सोने बनवतो पण गुरु तर शिष्याला थेट आपल्यासारखे बनवतात, म्हणून ते जास्त श्रेष्ठ. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूपच.

आध्यात्मिक गुरूं आपल्याला जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवितात. “गुरूबिन कौन बताये बाट, बडा विकट यमघाट।”, “बिन गुरु ग्यान कहाँसे पाऊँ” यासारखी कांही पदेही गुरुंच महात्म्य विषद करतात. मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा गुरुंच पूजन करण्याचा हा दिवस.

गुरूंना कल्पवृक्षाची उपमा दिलेली आहे. अगदी खरं आहे ते. आपण मनात चिंतायचं आणि गुरुनी ते पूर्ण करायचं. म्हणूनच श्री गणेशांच्या एका स्तोत्रात म्हटलं आहे, “मोरेश्वरसी शरणागत सिध्द गेला, त्याचा प्रपंच भवसागर पार झाला| ऐसे घडे जरी सदा नीज सेवकासी, रक्षीतसे गणपती तरी त्या नरासी||

गुरूचे कार्य केवळ विद्या देणे असं सीमित नाही. आपल्या जीवनविषयक अनुभवातून आलेले ज्ञान गुरू आपल्या शिष्यापर्यंत पोहोचवण्याच कार्य सहज करीत असतात. गुरु केवळ मार्ग दाखवीत नाहीत तर ते योग्य मार्गावर नेवून दर्शन करवितात. ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानात म्हटलच आहे, ”चला कल्पतरुंचे आरव.” ईश्वरनिष्ठ संत हे चालते बोलते कल्पवृक्षांचे बगीचे आहेत. तुमच्या योग्य इच्छा पूर्ण करून तुम्हाला चिंतामुक्त करणारी चिंतामणींची गावे आहेत, व अमृतमय वाणीने तुम्हाला बोध करून ईश्वर भक्तीकडे वळवून तुमचे परमकल्याण करणारे महात्मे आहेत.

शिक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, संगीत, नाटय़, वैद्यक, न्यायशास्त्र, अध्यापन, राजनीती, अध्यात्म अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत ही गुरूपरंपरा दिसते. अधिकार वाणीने आपल्या सद्गुरुना “कोमल चित्त वळवी आता” असे म्हणणारे प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुढे सद्गुरू पदास जातात, ही गुरुशिष्य परंपरा. “आपुल्या सारिखे करिती तत्काळ, नाही काळ वेळ त्या लागी”.आपल्या गुरुनी आपल्याला जे ज्ञान दिले, जो बोध केला, जी शिकवण दिली त्याच प्रत्यक्ष आचरण करणे म्हणजे खरी गुरुपूजा.

“सद्गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी?” सदैव सन्मार्गाची शिकवण देवून त्याची कास धरायला लावणारे सद्गुरू पाठीशी असतांना, त्या साधकास कशाची ददात असणार? मग त्यासाठी साधक तरी कसा असावा बरं? तर, रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलय की, शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक| शिष्य असावा साधक| साधनकर्ता|| (दासबोध द. ५ स. ३) आणि त्यासाठी हवी नित्य उपासना. “गुरूपूजन” ही समर्पणाची भावना आहे. सद्गुरुना काय आवडते हे एकदा कळले की जन्मभर त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे गुरुसेवा होय.

आज “पाटी-पूजन” कालबाह्य झालं असलं तरी, गुरुपूजनाची परंपरा आजही टिकून आहे, आणि पुढेही टिकून राहील यात तिळमात्र शंका नाही. कारण हा उत्सव कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. श्रद्धाशील विद्यार्थानी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होण्याचा आहे. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे आपले गुरुच आहेत. म्हणूनच आपण त्यांना गुरुजी, गुरुवर्य, म्हणतो. आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक, आपले गुरुच. अडचणींवर मात करून आपल्या विद्यार्थ्याना नवनवीन गोष्टी शिकविणे, त्यांची अभ्यासातील रुची वाढविणे या साठी प्रत्येक “गुरुजी” प्रयत्नरत असतात. म्हणूनच कोरोना काळातही विद्यार्थ्यांना सहज शिकवता यावं म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून QR Code च्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे गुरुजी, कौतुकास पात्र ठरतात. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे आकलन करणे त्यांचे मुल्यांकन करणे, तसे जीकिरीचेच. परंतु हे काम ही आपल्या गुरुजनांनी सढळ हाताने पार पाडलं, हे आपण नुकत्याच लागलेल्या शालांत परीक्षेच्या निकालातून बघितलेच आहे. या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन.

“भक्ती”, ज्याचा भगवंत भुकेला आहे, श्रद्धा आणि विश्वास, उपासना, स्मरण आणि जप, समर्पण आणि शरणागती अशा या पंच-पक्वान्नाचा नैवेद्य आपल्या सद्गुरुना दाखवून, गुरुनी दिलेला उपदेश, ज्ञान मी जीवनात आत्मसात करेन, अशी ग्वाही, या गुरुपुजनाच्या दिवशी एक संकल्प म्हणून आपण करीत असतो. समर्पणात आनंद आहे, प्रसन्नता आहे, आणि कर्तव्याची कृतार्थता आहे.

गुरु ही व्यक्ती नसून एक तत्व आहे. सद्गुरूंच्या दरबारात जावून अंत:करणापासून त्या उत्सवात सहभागी होणे, रममाण होणे हा “स्वर्ग सुखाचा” अनुभव अवर्णनीयच. भगवंत आणि शिष्य यांतील दुवा म्हणजे सद्गुरू. सद्गुरूंचा भगवंताशी सरळ संवाद असतो. म्हणूनच तर समर्थ रामदास स्वामी भगवंताला म्हणजे श्रीरामांना म्हणतात, “बुद्धी दे रघूनायका”. तर प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज भगवान दत्तात्रेयांना म्हणतात, ”श्री गुरुदत्ता जय भगवंता| ते मन निष्टुर न करी आता||. त्याचं हे “मागणं” स्वत:साठी नसतचं मुळी. ते असत जनकल्याणासाठी. समर्थ रामदास स्वामी आपल्या “गुरुस्तवनात “ म्हणतात,
आतां सद्गुरु वर्णवेना। जेथें माया स्पर्शों सकेना। तें स्वरूप मज अज्ञाना। काये कळे ॥ श्रीराम॥

कल्पवृक्ष सद्गुरू आपल्या नीज भक्तांना भरभरून देत असतात.
प. पू. श्री सद्गुरुदास महाराज म्हणतात की, सद्गुरुना ओळखायचे असेल तर तुम्हाला त्यांच्या अंतरंगात शिरावे लागेल. पण सद्गुरूंच्या अंतरंगात शिरणे आपल्या सारख्यांना शक्य नाही. तर मला सद्गुरुंना आपल्या अंतरंगात स्थान द्यावे लागेल. याला म्हणतात सद्गुरूंची पावले आपल्या हृदय सिंहासनावर स्थापन करणे, सर्व समर्पण करणे, सद्गुरूंची खोली अथांग आहे. आपण किती अनुभवतो हे आपल्यावर अवलंबून आहे.
”अखंड माझ्या हृदयात आहे, सबाह्य देही परिपूर्ण पाहे| टाकून मजसी नाहीच गेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला”||, असे स्मरण करून भाव सुमनांनी, आपण या गुरुपौर्णिमेला, आपल्या सर्वांच्या हृदयस्त सद्गुरूंचे पूजन करू या..

श्रीकांत तिजारे
९४२३३८३९६६.


आषाढस्य प्रथम दिवसे…. – 

आज महाकवी कालिदास दिन त्यानिमित्ताने…

भगवान परशुराम जयंती निमित्त… –

पर्यावरणाचे दूरद्रष्टा भगवान श्रीपरशुराम

 

Social Media