पितृपक्ष — एक संवाद !

पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्षाचा पंधरवडा !(Pitru Paksha is the fortnight of Shradh ) म्हणजे ते पंधरा दिवस ,जे पितरांसाठी काक रूपाने पृथ्वीवर येण्यासाठी मोकळीक असणारे दिवस. अगदी लहानपणापासून आपणांस हेच माहित असते की याच पंधरा दिवसांत आपले पूर्वज किंवा मृत नातलग पुन्हा एकदा आपल्या अवतीभवती काक म्हणजे कावळ्याच्या देही आपल्यामध्ये वावरत असतात..मग त्या अंतर्गत येणारे दिवस, विशिष्ट नियम हे त्या त्या पद्धतीने व शास्त्रोक्त नियमनांनी पार पाडले जातात.

थोडक्यात काय तर जिवंत माणसं मृत माणसांना यथेच्छ भोजन देऊन , एक महत्वाचे कर्तव्य पार पाडतात.. एरव्ही कधी त्या काळ्या रूपहिन कावळ्याला दुर्लक्षित करणारे आपण सर्व या पंधरा दिवसांत मात्र ” काऽऽव काऽऽव ” असे करून त्याची विनवणी करतो.. ये बाबा एकदशी . एखादी भाजी अथवा गोलाकार छोटासा भजीतरी ऊचल ..म्हणजे तु निवद शिवला की आम्ही सुखाने संसारचक्र चालू करायला मोकळे.. खरचं पिढ्यानुपिढ्या , वर्षानुवर्षे चाललेले चक्र.

अशा वेळी आम्हा साहित्य रसिकांच्या भावनांचा जणू उद्रेक होतो..दररोज वेगवेगळ्या कविता , चारोळ्या, लेख हे सर्व वाचायला मिळते .जुन्या परंपरेतून आपणांस आपल्या लेकरांना आदर्श पुत्र किंवा कन्या यांच्या संज्ञा अगदी सहजपणे समजावून सांगता येतात..
लिखाण करण्यासाठी जणू शब्दांचे बहर येतात…अशा सर्व दरवर्षी चालू असणार्या पंधरवड्याचा ” पितृपक्ष ” माझ्या साठी मात्र ” संवाद पक्ष ” असतो.!

सर्व लोकांना कावळ्याला जेवण देऊन खूश करायचं असतं , आणी मला त्याला अगणित प्रश्न विचारायचे असतात..खूप खूप बोलायचं असतं..प्रत्येक वेळी मी , ऊत्तरं न मिळालेले प्रश्न विचारायचे आणी कावळ्याने काव काव करून नुसतीच माझी समजूत काढायची .
आजही तेच प्रश्न…

या पंधरा दिवसांत दुसरे कावळे जेवायला येतात तु मला पहायला आली आहेस का ? अवघ्या नऊ दहा महिन्यांचे बाळ सोडून जाताना तुला काहीच का वाटलं नाही का ? या व्यवहारिक जगामध्ये जो तो आपापल्या सोयीनुसार जिवन जगत असतो , तुही मला सर्व सोयीस्कर वातावरण देऊन निघून गेलीस कायमची .पण तुला माहीत नाही का ? स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असतो.

आजही तेच प्रश्न….(The same questions today.)

सांग मला असं सोडून का गेलीस ? आई हवी असते गं…कशीही असो पण ती हवीच .. आईचा अर्थ अथांग आहे . समुद्राच्या पाण्याला मर्यादा नसते तशी आईची माया अमर्याद आहे. तुझ्यावर किती कविता केल्या तरी माझं पोट भरत नाही..कितीही वेगवेगळ्या दाखल्यांनी तुझे वर्णन करूनही मन रमत नाही..कारण मला अधूरं आणि अपूर्ण ठेवलस..माया ममता या शब्दांचे अर्थ मी किती ठिकाणी शोधले . आई अशीच असते का म्हणून प्रत्येकाच्यात , तुला पाहण्याचा प्रयत्नही केला..कधी कधी वाटतं लहानपणी कळत न्हवते तेच बरे होते..आता पडतात ते प्रश्नही पडत न्हवते..

आता माझी मुलं माझ्याकडे हट्ट करतात..माझ्याशी भांडतात अगदी बिनधास्त असतात त्यांना माहित असतं आई आहे..कोणत्याही लहानसहान गोष्टी असो अथवा अकस्मात येणारी संकटं असो आईचं छत्र आहे या जाणीवेणं ती चिंतामुक्त असतात.. आईचा एक शब्द यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो..आईची साथ असेल तर कुठलाच रस्ता अवघड वाटत नाही..तिला संकटांची चाहूल लागते आणी वेळीच लेकरास सावध करते… पण तु निघुन गेलीस आणी यशाची शिखरे तर दूरच अगदी अपयशाचं कारण सांगायलाही जागा उरली नाही. सभोवताली माणसांची प्रचंड गर्दी आहे..सख्खी – चुलत , रक्ताची -मानलेली ,आपली अन् परकी अशी कित्येक नाती आयुष्यातील वळणावळणाच्या प्रवासात एक वेगळा अनुभव व कडू-गोड आठवणी देतात.. येणार्या सर्व अनुभवांनाच गुरू मानुन हा जिवनप्रवास सुखकरपणे चालू आहे .पण याच नाजूक नात्यांची , नाजूकपणे गुंफलेली विण अपेक्षांच्या व अहंकाराच्या आवरणाने विळख्यासारखी वाटते तेव्हा मात्र तुझीच आठवण येते आई . मग मात्र खात्री वाटते हे सगळे क्षणीक आहे, आभासी आहे . म्हणूनच विखुरलेल्या मनाच्या पाकळ्यांचे पुष्प टिकवून ठेवण्यासाठी एकच धागा गरजेचा असतो.

तो धागा तुच..

आजही तेच प्रश्न… तु माझा धागा का झाली नाहीस ?
असं म्हणतात की , कुणावाचून कुणाचेही अडत नाही. होणारी गोष्ट होते. निसर्ग नियमाने आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात..बालपण , तारुण्य , शिक्षण आणी वैवाहिक जिवन . हे सर्व टप्पे पार करताना घ्यावे लागणारे निर्णय कितपत योग्य व अयोग्य असतात याची जाण कोणत्याही व्यक्तीला नसते..प्रत्येक टप्प्यावर पडत आलेले प्रश्न प्रत्येक वेळी नव्यानं समोर येतात..दिशाहीन व उथळ असल्यासारखं वाटायला लागतं..त्यावेळी सुध्दा आई तुझीच गरज वाटते.

म्हणूनच आजही तेच प्रश्न… योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करायला तु का न्हवतीस आई ?
अशा एक ना अनेक प्रश्नांना ऐकत तो कावळा नेहमीप्रमाणे माझ्या मनाचा ठाव घेतोय असं वाटतं.. कोणत्याही पंच पक्वांन्नांचा हव्यास किंवा कोणतेही मंत्रोपचार यासाठी नक्कीच येत नसावा. पण याच पितृपक्षाच्या कालावधीत येतो एवढं मात्र खरं !
मनातली मळभ निघून गेल्यावर मला वाटणारा हलकावा व पुन्हा चेहर्यावर समाधान पाहून त्याचेही पोट भरत असेल. आणी मलाही त्या काकदर्शनाने नवचैतन्य व आधार मिळतो , पुन्हा वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जाण्यासाठी.

असं म्हणतात की मुके प्राणी , पक्षी खूप संवेदनशील असतात. भविष्यातील घटनांचे संकेत देतात , कदाचित हा , पितृपक्षाच्या निमित्ताने मला नियमीतपणे भेटायला येणारा एकाक्ष(कावळा) सुध्दा , त्यापैकीच एक असेल म्हणूनच नुसत्या त्याच्या आगमनाने व मर्यादित सहवासाने सुध्दा जिवनात आनंदलहरी आल्याचा भास होतो..
असा हा आमचा पितृपक्षातील संवाद म्हणजे व्यक्ताव्यक्त मायेचा अविष्कारच असतो.

सौ. सविता जितेंद्र माने. 7799558915
श्रीमती सविता जितेंद्र माने
पामिडी.(जि.अनंतपूरम.) आंध्र प्रदेश
संपर्क 7799558916


आला रे आला पोळ्याचा ‘सण’… –

आला रे आला पोळ्याचा ‘सण’…

Social Media