मुंबई : राज्यात मुंबईसह सध्या २७ महापालिका आणि ३७९ नगरपालिका- नगरपंचायती मध्ये दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग त्या शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणुका पार पाडते. त्यानुसार बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यावर मुंबई महापालिका वगळता अन्य महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या सदस्य संख्येत १५ टक्के वाढ करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी-मार्च२०२२ नंतर १५ महापालिकांची मुदत संपणार
२०११ च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान १६ तर जास्तीत जास्त ६५ सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान ६५ तर जास्तीत जास्त १७५ पर्यंत आहे. मात्र मुंबई महापालिकेत ही संख्या २२७ आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशात सन २०२१ ची जणगणना अद्याप सुरु झाली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान १५ महापालिकांच्या तसेच सुमारे शंभर हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
महापालिका कायद्यात सदस्यवाढीचा प्रस्ताव
त्यासाठी राज्य सरकारने प्रस्तावित अध्यादेशाच्या माध्यमातून महापालिका कायद्यात सुधारणा करुन सदस्यवाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्याची तयरी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी त्रिसदस्यीय प्रभाग पध्दती चा निर्णय घेताना तीनही पक्षांमध्ये तीव्र मतभेद होते, त्यानुसार शिवसेनामुंबईत सदस्य संख्या वाढवण्यास उत्सुक नसल्याचे समजते मात्र राज्यात अन्यत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका राहते यावर या निर्णयाचे भवितव्य आहे.