पणजी : “द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड (El Rey de Todo El Mundo) हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता कार्लोस सौरा यांचा 12 वर्षांच्या कालखंडानंतर काल्पनिक कथाविश्वात पुनरागमन करणारा चित्रपट आहे. या 12 वर्षांमध्ये, सौरा हे संगीतमय माहितीपट बनवत होते, त्यांच्या जिव्हाळ्याच्या संगीताच्या विश्वात रममाण होते. ” हे शब्द आहेत द किंग ऑफ ऑल द वर्ल्डचे निर्माते युसेबियो पाचा यांचे, ज्या चित्रपटाने 20-28 नोव्हेंबर 2021 दरम्यान गोव्यात आयोजित 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. युसेबियो पाचा आज 21 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यात सहाय्यक निर्मात्या मिर्टा रेनी यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलत होते.
कार्लोस सौरा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, त्यांच्याच कारमेन (1983) आणि टँगो (1998) या चित्रपटांचा वारसा असलेल्या सांगीतिक त्रयीतील शेवटचा चित्रपट आहे., सांगीतिक माहितीपटांबद्दलच्या त्यांच्या सर्जनशील वेडामुळे ते काल्पनिक चित्रपटांपासून 12 वर्ष दूर राहिले. असे युसेबिओ पाचा यांनी स्पष्ट केले.
या चित्रपटातही सौरा यांच्या संगीत आणि नृत्याच्या आवडीने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगत युसेबिओ पाचा म्हणाले : “द किंग ऑफ द वर्ल्डमध्ये, सर्व प्रकारचे संगीत – मग ते लोकसंगीत असो, पारंपारिक असो किंवा आधुनिक – मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेचा इतर भागातील संगीत एका जबरदस्त संगीत संगमासाठी एकत्र गुंफले आहे
‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’हा चित्रपट, जागतिक चित्रपटविश्वातील या दिग्गज, ज्येष्ठ चित्रकर्मीची सातवी एकत्रित केलेली कलाकृती आहे. ऑस्कर नामांकन प्राप्त दिग्दर्शक कार्लोस सौरा आणि ऑस्कर चित्रपट विजेते छायाचित्रकार, व्हित्तोरियो स्टोरारो, ज्यांना गेल्यावर्षीच्या इफ्फी मध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते, त्यांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे.
उसेबियो पाचा यांनी या दोघांच्या अद्वितीय प्रवासाविषयी आणि त्यांच्यातील सौहार्दा विषयी यावेळी माहिती दिली. “हे दोघे एकमेकांना पूरक आहेत. या दोघांमध्ये स्नेहाचा एक मजबूत बंध आहे, ते एकमेकांना समजून घेतात, एकमेकांना काय हवे आहे, ते या दोघांनाही न सांगताच कळते.”
हा चित्रपट अत्यंत सुरेल संगीत, अद्वितीय नृत्याविष्कार आणि चित्तथरारक दृश्यांचा अदभूत असा कोलाज आहे. या चित्रपटात अनेक ठिकाणी सौरा यांची छाप जाणवते. एका ठिकाणी दिग्दर्शकाने काळाची अभिव्यक्ती दर्शवण्यासाठी, हिंसेचा वापर केला आहे. वास्तव आणि कल्पनेचा संगम, भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालून अभिव्यक्त होणे, ही खास सौरा यांची शैली या चित्रपटातही दिसते.
या चित्रपटात घडत असलेल्या काही घटना कथानकाचा भाग म्हणून येतात, या दृश्यात, हिंसा दुय्यम भूमिकेत आहे, हा चित्रपट राजकीय नाही किंवा, रुपकात्मकही नाही, असे, सहायक निर्माता मित्रा रेंनी यांनी सांगितले. “हा चित्रपट केवळ मेक्सिकोमध्ये झालेल्या हिंसाचाराविषयी नाही, तर प्रत्येक व्यक्तीला ज्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो, त्याविषयी आहे. याचा कोणत्याही राजकीय मतांशी संबंध नाही. एकप्रकारे ही कथा, लॅटिन अमेरिका आणि मेक्सिकोचा इतिहास मांडणारी आहे.”
स्पेन आणि मेक्सिको या दोन देशांना एकमेकांशी जोडणाऱ्या बंधांचा उहापोह करणारा स्पॅनिश आणि मेक्सिकन सहनिर्मिती असलेला हा चित्रपट. यात दोन्ही देशांतील चित्रपट सृष्टीतील कसलेले अभिनेते आणि नर्तक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आना डे ला रीगेरा, मॅन्युएल ग्रासीआ रुल्फो, डामीअन अल्काझार, एन्रिक आर्क, मोनोलो कॅर्दोना, आयझाक हर्नान्देझ आणि ग्रेटा एलोझोन्डो हे यात मुख्य भूमिकेत आहेत.
प्रथमच भारतात आलेल्या या चमूने, त्यांचा चित्रपट आणि त्यांना या महोत्सवात संधी दिल्याबद्दल इफ्फीचे मनापासून आभार मानले आहेत. “दिग्दर्शक सौरा आणि मी उत्तम मित्र आहोत आणि आम्हाला वाटते मेक्सिको आणि भारतात अनेक समानता आहेत, मग तो वर्ण असो, संगीत असो अथवा संस्कृती.”
याच धर्तीवर भारताशी अधिक भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त करून उसेबिओ पाचा यांनी असे मत मांडले की, त्यांना असे वाटते की भारतीय चित्रपट अनेकदा भारतापुरते मर्यादित राहतात ,मात्र ते किती उत्तम असतात याची जगाला ओळख करून देण्याची नितांत गरज आहे. “चित्रपटांची आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती ही काळाची गरज आहे. यामुळे अभिनेते, चित्रपट आणि संस्कृतीची देवाणघेवाण सहजतेने होईल.”
कथासार : मन्युएल त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाची तयारी करतो आहे.एक सांगीतिक कार्यक्रम करण्याविषयीचा हा शो असणार आहे. त्यासाठी तो त्याची पूर्व पत्नी आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार, साराची मदत मागतो. या कार्यक्रमासाठी कलाकार निवड होत असतांना, , युवा इनेस् आपले वडील आणि स्थानिक लोकांशी सामना करतांना, एक उदयोन्मुख कलाकार म्हणून उदयाला येतो. कार्यक्रमाची तालीम सुरु असतांना, नर्तकांमधील उत्साह आणि स्पर्धेमुळे येणारा तणाव दोन्ही वाढू लागते. अत्यंत प्रभावी असे मेक्सिकन संगीत, एकूण वातावरणाची योग्य पार्श्वभूमी तयार करते, आणि मग जे नाट्य सादर होते, त्यात, शोकांतिका, कल्पना आणि वास्तव या सगळ्यांचा मेळ असतो.