मुंबई : शिवसेना आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात त्यांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र आमदार असताना लाभाचे पद घेता येत नसल्याच्या कारणावरून त्यांची नियुक्ती वादात सापडली होती.
आता त्यांच्यावर आमदारांच्या मागण्या समजून घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे. ज्या मागण्याचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामे लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या आपआपल्या मतदारसंघानुसार अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांचा योग्य पाठपुरावा झाला नाही त्यामुळे आमदारांची कामे होत नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार करण्यात येत होती. त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सेनाभवनच्या सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी असेल.
दरम्यान, रविंद्र वायकर यांनी याआधी युती सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. जवळपास साडेचार तास उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या अडचणी समजून घेतल्या. या बैठकीत रविंद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत समन्वयक म्हणून काम करतील असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. यापुढील काळात रविंद्र वायकर शिवसेना आमदारांच्या अडलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहेत. रविंद्र वायकर शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकासआघाडीचे नेतृत्व करत असतानाही पक्षाच्या आमदारांच्या मागण्यांकडे देखील बारकाईने लक्ष देताना दिसत आहेत. तसेच समन्वय व्हावा म्हणून तशा व्यवस्थाही करत आहेत. विशेष म्हणजे तिन पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या या सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनीही नाराजीचे सूर काढले होते. हा अनुभव पाहता उद्धव ठाकरे स्वपक्षीयांकडे अधिक लक्ष देताना दिसत आहेत.