नागपूरच्या 20 वर्षीय मालविकाडून सायना नेहवाल पराभूत, 34 मिनिटांत मिळवला विजय

नवी दिल्ली : इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या २० वर्षीय मालविका बनसोडने(malvika bansod) अनुभवी खेळाडू आणि लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवालचा(Saina Nehwal) पराभव केला. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मालविकाने लागोपाठच्या गेममध्ये सायनाचा २१-१७, २१-९ असा पराभव केला. हा सामना 34 मिनिटे चालला. सायना सध्या जागतिक क्रमवारीत 25व्या क्रमांकावर आहे. तर मालविका 111व्या क्रमांकावर आहे.

पहिल्या गेममध्ये ४-४ अशा बरोबरीनंतर आघाडी

पहिल्या गेमच्या सुरुवातीला सायना आणि मालविका यांच्यात बरोबरी झाली. एका वेळी दोन्ही खेळाडू ४-४ बरोबरीत होते. त्यानंतर मालविकाने आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत राखली. दुसऱ्या गेममध्येही दोघेही 2-2 अशा बरोबरीत होते. येथून मालविकाने आघाडी घेतली आणि खेळ आणि सामने जिंकेपर्यंत ती आघाडी कायम  राखली.

कोण आहे मालविका बनसोड?(malvika bansod)

मालविका ही महाराष्ट्रातील एक नवोदित बॅडमिंटन स्टार आहे. तिने 13 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील स्तरावर राज्य स्पर्धा जिंकल्या आहेत. 2018 मध्ये, तिची जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. 2018 मध्ये तिने काठमांडू येथे दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. 2019 मध्ये तिने अखिल भारतीय वरिष्ठ रँकिंग स्पर्धा जिंकली. 2019 मध्येच मालविकाने मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सीरीज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Social Media