मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने गरीब, शेतकरी, कष्टकरी, तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातील एक तत्वनिष्ठ व संघर्षशील पर्व संपले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, आपल्या सात दशकांहून अधिक काळच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत एन. डी. पाटील साहेब कायम शेतकरी, कष्टकरी, तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आणि पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहिले. उच्च शिक्षित असलेल्या एन. डी. पाटील साहेबांनी सुरुवातीच्या काळात अध्यापनाचे कार्य केले. शिवाजी विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेत महत्वाची पदे भूषवली. विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी कायमच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सभागृहात अत्यंत आक्रमपणे आवाज उठवून ते सोडवण्याचा प्रयत्न केला. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी ते अखेरपर्यंत लढत होते. राजकारणासोबतच राज्याच्या सामाजिक चळवळ, शिक्षण, साहित्य आणि सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि तळागाळातील लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.