पार्थाने पितामहांवर शरसंधान करून शरपंजरी करण्याच्या कृष्णकारस्थाना मागचे शिखंडी कोण आणि बोलवते धनी कोण?

मुंबई  : महाभारताच्या कथानकातील हजारो वर्षापूर्वीचे संदर्भ सध्या महाराष्ट्राच्या महाविकास पर्वात ‘लाईव्ह’ झाल्याचे पहायला मिळत आहे. टाळेबंदीच्या काळात मोदीकृपेने आपण सर्वानी पुन्हा एकदा दूरदर्शनवरून महाभारत ही गाजलेली मालिका पाहिली असेलच. तेच संदर्भ थोड्याफार फरकाने पुन्हा एकदा असे लाईव्ह पहायला मिळतील असे मात्र तेंव्हा वाटले नव्हते, प्रभू कृष्ण लिला अगाथ आहे म्हणतात ना ते यालाच! त्या महाभारतात भिष्म आणि पार्थ यांच्या व्दंदात शिखंडी आणि कृष्ण यांचे सहभाग स्पष्ट दिसत होते मात्र सध्याच्या महाविकास पर्वात भिष्मांशी पार्थंचे व्दंव्द दिसत असले तरी  त्यामागचे कार्यकारण आणि कृष्ण कारस्थान मात्र दृश्यमान नाहीत! त्यामुळे शिखंडीच्या आडून पार्थ भिष्मांवर बाण चालवताना दिसत असले तरी शिखंडी मात्र दिसत नाहीत असेच म्हणावे लागते नाही का? महाभारताच्या युध्दात अंबेने भिष्माचार्यांच्या समोर शिखंडीच्या रूपात शस्त्र हाती घेवून आव्हान दिले पण ‘सर्वज्ञानी’ महायोध्दा भिष्मानी ‘स्त्री’वर शस्त्र चालवायचे नाही या क्षत्रिय वचनाला जागून धनुष्य खाली ठेवले आणि शिखंडीच्या आडून पार्थाने भिष्मांना शरपंजरी केले, ज्यांना अन्यथा कुणी जिंकू शकले नसते. मात्र कृष्णाने ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ म्हणत पांडवाना जी व्यूहरचना सांगितली त्यातून हे कथानक घडले आणि भिष्माचार्य कुरूक्षेत्रावर उत्तरायणाची वाट पहात शरपंजरी पडून राहिले. आजच्या महाविकास पर्वात जे भिष्माचार्य आणि पार्थ यांच्यात व्दंव्द सुरू आहे त्यात शिखंडी आणि कृष्ण मात्र गुप्त रूपाने काम करत आहेत. यालाच कलियुग म्हणत असावेत नाही कां?

अथ महाभारत कथा सांगायचे प्रयोजन हेच की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या नातवानेच राजकीय आव्हान दिल्याचे चित्र सध्या दिसत असून पवार घराण्यातील या महाभारतामध्ये सा-या राज्याच्या राजकारणाची ‘दिशा’ बदलण्याची शक्यता आहे. असे असले तरी थोरल्या साहेबांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर पार्थचे वडील- उपमुख्यमंत्री अजित पवार, आत्या- खासदार सुप्रिया सुळे, चुलत भाऊ- आमदार रोहित पवार किंवा खुद्द पार्थ असे पवार कुटुंबातील कोणीच याबाबत आता प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. पण २७ नोव्हेंबर पासून पाण्यात देव घालून बसलेले विरोधक आणि राज्यातील कोल्हेकुई माध्यमांना बाईट साठी मोठा विषय मिळाला आहे इतका की या विषयाची राष्ट्रीय बातमी देखील झाल्याचे पहायला मिळत आहे. राजकारणात पाच दशकांहून अधिक काळ गेलेल्या आजोबांनी आपल्या नातवाला उद्देशून तो अपरिपक्व आहे असे म्हटल्याने सध्याच्या पिढीत इगोचा मुद्दा होणे स्वाभाविकच आहे.

सध्याची पिढी वडीलांनी शाळेचा गृहपाठ का केला नाही अशी विचारणा केली म्हणून आत्महत्या वगैरे केल्याचे आपण बातम्यामध्ये पाहतो त्या पठडीतली आहे, बरे गंमत अशी की ज्या आजोबांना या नातवाने पन्नास लाखांचे कर्ज दिल्याचे त्यांनीच त्यांच्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात नोंदविले आहे त्या आजोबांनी जाहीरपणे आपण ज्याचे देणे लागतो त्याला तो अगदी सख्खा नातू असला तरी कसे बरे चालणार आहे?! त्यामुळे पार्थ बाबाला प्रचंड राग आल्याने मिडीया आणि विरोधकांच्यासाठी वृतपर्वणीचे ठरले ( तरी बरे मुद्रीत माध्यमे सध्या कोमात गेली आहेत नाहीत वृत्त पर्वणीची विशेष पुरवणी सुध्दा करता आली असती!) त्यामुळे या आधुनिक लाईव्ह महाविकास पर्वातील महाभारतामध्ये महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारी एक शक्यता वर्तवली जात आहे. ती म्हणजे पार्थ पवार पक्ष सोडण्यासारखा मोठा निर्णय घेण्याची! या तर्काला संदर्भ दिला जात आहे की खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत पार्थबद्दल चर्चा झाल्याचे संकेत आहेत. भाजपचे काही नेते त्यामुळे समूह माध्यमांतून आजोबां विरोधात बंड पुकारत नातू वेगळा निर्णय घेणार इत्यादी कंड्या पिकवत प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ‘परिपक्व’ राजकारणी म्हणून हा पवार यांच्या कुटुंबातील विषय आहे त्यात आम्ही काही राजकारण करत नाही हे स्पष्ट करून टाकले ते बरे म्हणायचे!

अश्या स्थितीतही काही माध्यमे मात्र  खासदार नारायण राणे यांच्या कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केल्याच्या तसेच त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा असल्याच्या बातम्या देताना दिसत आहेत. श्रीराम मंदिर ते सीबीआय चौकशी अशा विषयांत प्रत्येक वेळी नेमकी शरद पवार यांच्या भुमिकेच्या विपरीत भुमिका मांडणाऱ्या पार्थ पवारांना भाजपची वाट चोखळायचीऑफर तर नाही ना असा प्रश्न त्या निमित्ताने विचारला जात आहे. ज्यामुळे संयमी बोलण्यासाठी नेहमी प्रसिध्द असलेल्या पवारांनी जाहीरपणे नातवाची अशी हेटाळणी करावी?! दया कुछ तो गडबड है!

मग पार्थ जर अपरिपक्वपणाने वागत असतील तर त्यांचे बोलवते धनी कोण या मुद्याचा तपास सुरू केला जातो. फ्लँशबँकमध्ये जात मग लोकांना २३नोव्हेंबरच्या भल्या सकाळी जे झाले ते आठवत राहते. वर्षभरापूर्वी लोकसभेत पराभव झाल्यानंतर शांत बसेलेल्या पार्थ पवारांनी आपल्या राजकीय प्रवासाला राष्ट्रवादीतून वाट मिळत नसेल तर भाजपच्या वाटेने जाण्याचा निर्णय घ्यावा असे त्यांच्या वडीलांनाच वाटत असावे का? त्यांच्या शब्दाबाहेर तर पार्थ असे काही करूच शकत नाही असे सांगण्यात येवू लागले. त्यामुळे भिष्म पितामहांचे वाग्बाण येण्यास कारण ठरलेले पार्थाचे वागणे, वडीलांच्या सल्ल्यानेच तर सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, पारनेरात शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश आणि राम मंदीराच्या मुद्यावर पक्षाच्या नेत्यांच्या भुमिकेच्या परस्पर विसंगत जय श्रीरामची भुमिका घेणे केले असावे का? याची उत्तरे अजून तरी मिळत नाहीत. त्यामुळे मग तपास आणखी मागे जात घ्यावा लागतो किंवा घेतला जात आहे.

लोकसभा पराभवानंतर पार्थच्या राजकीय पुनर्वसनाचे काय? या प्रश्नाचे उत्तर भिष्माचार्यांनी प्रलंबित ठेवले असताना दुसरीकडे त्यानी शिवसेनेतल्या सहकारीपक्षाच्या आदित्य सारख्या नेत्याला मार्गदर्शन करण्यात काहीच कसूर केल्याचे दिसत नाही. किंबहूना जेंव्हा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत राजकीय वावटळ उठली त्यावेळी देखील पवार यांनी त्यांच्या पक्षाकडे असलेल्या गृहमंत्रालयाचा थेट अधिक्षेप झाल्याचे सांगण्यात येत असताना प्रतिवाद केला का नाही? असा दुखरा प्रशन विचारला जात आहे. म्हणजे नातवासमान असलेल्या आदित्यला वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आपले कसब पणाला लावतात मात्र स्वत:च्या घरातल्या नातवाच्या बाबतीत दुजाभाव करतात ही ती तरूणाईची सहज सुलभ टोचणी घेवून हट्टाने पार्थाने वेगळी भुमिका घेतली असावी का? अशी विचारणा राष्ट्रवादीच्या निकटवर्तुळात होताना दिसते. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता. पण त्याला शरद पवार यांनी विरोध केला. त्यावरुन वादंग निर्माण झाला, असेही सांगितले जात आहे त्यात तथ्य नसेलही कदाचित मात्र राष्ट्रवादीत थोरली पाती आणि धाकली पाती अशी शकले असल्याच्या चर्चेला त्यामुळे बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळेस भाजपच्या नेत्यानी पवार कुटूंबावर जी घणाघाती टिका केली होती त्यामागचे इंगित काय असावे याची त्यामुळे कल्पना केलेली बरि! पार्थ पवार  यांनी हट्टाने मावळ लोकसभा लढवली त्यात ते निवडणूक जिंकू शकले नाही.

त्यामुळे पक्ष सोडण्यासारखा मोठा निर्णय ते फक्त स्वत:च्या मनाने घेतील असे नाही. त्यांच्या आत्या सुप्रिया सुळे दिल्लीच्या राजकारणात आहेत. वडील राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दुसरे बंधू रोहित पवार राजकीय वारसदार म्हणत आमदार झाले आहेत त्यामुळे पार्थ यांची कोंडी झाल्याचे चित्र तर स्वाभाविक दिसत आहे. त्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मतभेद नाहीत असे सांगितले जात असले तरी अलबेलही नाही हे एव्हाना बाहेर आले आहे. जाहीर अपमान झाला म्हणून नाराजी दाखविण्यासाठी पार्थ पवार फार तर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतील. त्याने पक्षात त्यांना मागे फिरण्यासाठी विनवण्या होतील आणि त्यांना काही वदवून घेता येईल इतकाच विषय असेल तरी जाणत्या नेत्यांच्या अजाणत्या नातवांने त्यासाठी  ईतके सारे काही करण्याची खरेच काही गरज आहे का असा नवा च मुद्दा निर्माण केला जावू शकतो! मात्र वेगळा निर्णय घेण्याची शक्यताच असेल तर पार्थ नाही तर अजित पवारना असेल आणि पार्थच्या निमित्ताने ते आपले म्हणणे वदवून घेवू इच्छित असतील किंवा खुंटी हलवून बळकट करत असतील तर काही सांगता येत नाही बुवा कारण त्यांनी यापूर्वी जे काही घडवले होते त्याचा धसका उभ्या महाराष्ट्राने आजही घेतला आहे. या सरकारमध्ये अजित पवार फारसे खुश नाहीत हे त्यांच्या वागण्यातून त्यांनी अनेकदा दाखवूनही दिले आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा पवार कुटुंबातील दोन पिढ्यांचा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे.

त्याची सुरुवात २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते त्यावेळी पहायला मिळाली. त्याच वेळी पार्थ पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट दिले तर चुकीचा संदेश जाईल आणि कार्यकर्ते नाराज होतील, असे मत पवारांनी त्यावेळी व्यक्त केले. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवणे निश्चित झाले होते. त्यामुळे नातवाच्या हट्टापायी पवार आजोबांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. पण पार्थ यांच्या पदरी त्यावेळी यश पडले नाही. त्यानंतर विधानसभा निवडणूकांचा प्रचार सुरू असताना राष्ट्रवादीने पक्षाच्या झेड्यांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा झेंडाही पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये फडकावण्याचा आदेश अजित पवारांनी दिला होता. मात्र राष्ट्रवादीच्या सभा किंवा रॅलींमध्ये भगवा झेंडा वापरण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसून तो अजित पवार यांचा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने त्या विषयावर पवारांच्या धाकल्या पातीला तलवार म्यान करावी लागली होती. त्यानंतर शरद पवार एकाकीच वय आणि तब्येतीचा विचार न करता निवडणूक प्रचारात उतरल्याचे आणि अजित पवार त्यात मागे पडल्याचे दिसत होते.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर सप्टेंबर २०१९मध्ये शरद पवार  यांनी स्वत:हून ईडीला अंगावर घेत कार्यालयात जाण्याचे जाहीर केले. त्याचवेळी अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी औपचारिकता म्हणून राजीनामा दिल्याने चर्चा रंगली. शरद पवारांवर फोकस झाल्याने लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी अजितदादांनी राजीनामा दिल्याचीही कुजबूज होती, मात्र आपण पवार साहेबांवर अश्या प्रकारे ईडीलिंबूचा प्रयोग करण्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठीच राजीनामा दिला असे अजीतरावाना नंतर सांगावे लागले! देवेंद्र फडणवीस सोबत पहाटेच्या वेळी अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ चांगलीच गाजली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची सरकार स्थापनेबाबत बोलणी सुरु असल्याने सर्वच चक्रावले. मात्र पवारांनी यामागे आपला हात नसल्याचे स्पष्ट केले होते. त्या काळात पवार कुटुंबातील वातावरणही गंभीर होते. अवघ्या तीन दिवसात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि फडणवीस सरकार अल्पायुषी ठरले. त्यामुळे पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या अपरिपक्व भूमिका दोन वेळा घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

पार्थ पवार यांनी २७ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे, असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले होते. मंदिर बांधून कोरोना जाईल असे काही जणांना वाटते मात्र आमचे प्राधान्य कोरोनालाच राहिल असे शरद पवार म्हणाले होते. मात्र त्यानंतरही पार्थ याने भूमिपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’चा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

या मुद्यावरून माध्यमांनी मग पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली त्याबाबत शरद पवार यांना विचारणा केली तर ते अनपेक्षीतपणे म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचे, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही” या वक्तव्याने माध्यमातून महाभारत घडत असताना सध्या मला काही बोलायचे नाही अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती. त्यामुळे पितामहांना शरपंजरी पाडण्याच्या पार्थाच्या या शरसंधानामागचे शिखंडी कोण आणि कृष्णकारस्थानामागचे बोलवते धनी कोण हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीत राहिला आहे. !

Social Media