शपथेचा भंग केल्यामुळे मविआचे मंत्रिमंडळ बरखास्त करा

मुंबई : अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे आणि मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शनिवारी मुंबईत केली.

राज्यपालांना निवेदन सादर केले त्यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, प्रदेश सचिव संदिप लेले, ठाणे शहराध्यक्ष आ. निरंजन डावखरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख आ. राहुल नार्वेकर, ॲड. शहाजीराव शिंदे, ॲड. कुलदीप पवार आणि प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

राज्यपालांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकार स्थापन करताना मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना कोणाही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक लाभ करून देणार नाही, अशी शपथ घेतलेली असते. तथापी, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून देणारा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने शपथेचा भंग केला आहे. या प्रकरणी राज्याच्या अर्थखात्याने अनेक आक्षेप घेतले होते पण त्याकडे दुर्लक्ष करून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. राज्यपालांनी त्यांना शपथ दिलेली असल्याने त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. यानंतर आपण या प्रकरणी लोकायुक्तांकडे दाद मागणार आहोत तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येईल.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल ठरले हे अपेक्षितच होते. सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करून सूर्याचे तेज रोखता येत नाही हे त्यांच्या राज्यातील टीकाकारांनी ध्यानात घ्यावे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे गोवा राज्यातील प्रभारी आहेत. ते तेथील परिस्थिती चांगली हाताळतील व स्पष्ट बहुमतासह गोव्यात पुन्हा भाजपाचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Social Media