नागपूरमध्ये शाळांचा निर्णय 26 जानेवारी नंतर

नागपूर : सोमवार पासून राज्यात शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले तरी नागपूर जिल्हयात रुग्णसंख्या वाढत असल्याने आताच शाळा सुरू करण्यात येणार नाही. 26 जानेवारी नंतर यावर बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूरात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर शहरामध्ये जवळपास पाच हजार करोना रुग्ण संख्या असून ही स्थिती चिंताजनक झाली आहे याचे गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. या परिस्थितीत लसीकरणाला प्राधान्य दिले जात असून शहरातील मेडिकल ,एम्स , मेयो येथे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे . परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच करोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन होण्यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे.

यासाठी आपण येत्या सोमवारी राजकीय प्रतिनिधी, व्यापारी संघटना तसेच प्रसारमाध्यमांशी सुद्धा संवाद साधणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. शिक्षण व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असे कोणतेही प्रकारचे निर्बंध आपण लावणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Social Media