मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी करण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी यासंबंधीचे आदेश जारी केले असून, हा निर्णय प्रायोगिक तत्वावर लागू होणार आहे.या निर्णयाने महाराष्ट्र पोलीस दलातील महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक (जीडीपी) संजय पांडे यांच्या वतीने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी होणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठीचा हा नवीन निर्णय प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात येणार आहे.
पुढील आदेश येईपर्यंत तो लागू असणार आहे.पोलीस खात्यात काम करताना साधारणपणे, पुरूष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना १२ तासांची ड्युटी असते.
पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलांवर कामाची आणि कौटुंबिक जबाबदारी देखील असते. यामुळे त्यांची बरीच दमछाक होते. यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये आजारी पडण्याचं अन्य व्याधींनी ग्रस्त होण्याचं प्रमाण वाढतं. हे टाळण्यासाठी गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव आला होता. त्यावर पोलीस महासंचालकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याची ८ तास ड्युटी केल्यास महिला पोलीस कर्मचारी गैरहजर राहणे, आजारी पडणे हे प्रमाण कमी होईल, अशी धारणा यामागे आहे. मात्र सण उत्सव काळात महिला कर्मचाऱ्यांच्या तासाबाबत वरिष्ठांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
आपत्कालीन स्थितीत किंवा सणासुदीच्या काळात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकतात. मात्र, ते केवळ संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्तांच्या परवानगीने करता येऊ शकते.असे ही पोलीस महासंचालकांनी आदेशात म्हटले आहे .