मुंबई : मुंबई विभागिय अमंली पदार्थ विरोधी विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नबाब मलिक यांच्या विरोधात सात दिवसांत गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई पोलीसांना दिले आहेत. त्यापूर्वी सुनावणी करीता मुंबई पोलीसांना आयोगाने समन्स बजावला होता त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रविण पडवळ हजर राहिले होते. त्यावेळी गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल आयोगाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वानखेडे विरोधात कोणतीही कारवाई करू नये
या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचलाक आणि मुंबई पोलीसांना आयोगाने नोटीस जारी केली होती. आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्या समोर समीर वानखेडे देखील हजर राहिले होते, त्यानंतर त्यानी सदर आदेश दिले. राज्य सरकारने या प्रकरणात तपास पूर्ण करून आयोगाला अहवाल सादर करावा तोपर्यंत वानखेडे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नये असा आदेश दिला आहे. नबाब मलिक यांनी वानखेडे आणि कुटूंबियांवर खोट्या जात प्रमाणपत्रा संबंधी आरोप करत तक्रार दाखल केली असून त्यावर जात पडताळणी समिती समोर सुनावणी सुरू आहे. या विरोधातआपल्यावर राजकिय हेतूने खोटे आरोप करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल केली होती.